Krishnamachari Srikkanth On Team India: आशिया चषक २०२५ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या ९ सप्टेंबरपासून यूएईत या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. मंगळवारी (१९ ऑगस्ट) या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.या संघाचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे असणार आहे. तर संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. पण या संघाची घोषणा झाल्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूंबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यशस्वी जैस्वाल, वॉशिंग्टन सुंदर आणि श्रेयस अय्यर यांना संघात स्थान देण्यात आलेलं नाही. या तिन्ही खेळाडूंनी अलीकडेच दमदार कामगिरी केली आहे. तरीसुद्धा संघ निवडताना या तिघांचा विचार करण्यात आलेला नाही. दरम्यान या संघाची घोषणा झाल्यानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णमचारी श्रीकांत यांनी जोरदार टीका केली आहे.

हा संघ एकवेळेस आशिया चषक जिंकू शकतो, पण टी-२० वर्ल्डकप जिंकण्याची क्षमता या संघात नसल्याचं कृष्णमचारी श्रीकांत यांनी म्हटलं आहे. आशिया चषकासाठी संघाची घोषणा झाल्यानंतर, कृष्णमचारी श्रीकांत यांनी आपल्या यू्ट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की,” तुम्ही या संघासह टी-२० वर्ल्डकप खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहात? ही तुमची टी-२० वर्ल्डकपची तयारी आहे? अक्षर पटेलची उपकर्णधारपदावरून सुट्टी केली. हर्षित राणा, रिंकू सिंग आणि शिवम दुबे संघात कसे आले, हे मला माहित नाही. टी-२० वर्ल्डकप स्पर्धा अवघ्या ६ महिन्यांवर आहे. हा संघ निवडून आपण मागे जात आहोत. संघ निवडताना आयपीएलचा विचार केला जातो. पण निवडकर्त्यांनी त्याआधी केलेल्या कामगिरीचा विचार केलेला दिसतोय. आपण या संघासह आशिया चषक जिंकू शकतो, पण टी-२० वर्ल्डकप जिंकण्याची क्षमता या संघात नाही.”

गेले काही महिने संघाबाहेर असलेल्या शुबमन गिलला टी-२० संघात पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली आहे. यासह त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली आहे. तर दुसरीकडे टी-२० वर्ल्डकपविजेत्या संघाचा भाग असलेल्या यशस्वी जैस्वालला या संघात स्थान देण्यात आलेलं नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरला देखील या संघात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे भारताचा माजी फिरकी गोलंदाज आर अश्विनने देखील नाराजी व्यक्त केली आहे.

आगामी आशिया चषक २०२५ स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित सिंह राणा, रिंकू सिंह

राखीव खेळाडू
प्रसिध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल, रियान पराग