Virender Sehwag Asia Cup 2025 Winner Prediction: आशिया चषक २०२५ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. येत्या ९ सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे असणार आहे. तर संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, युएई, ओमान आणि हाँगकाँग असे ८ संघ जेतेपदासाठी भिडताना दिसणार आहेत. दरम्यान भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने कोणता संघ ही स्पर्धा जिंकणार, याबाबत भविष्यवाणी केली आहे.

कोणता संघ उंचावणार जेतेपदाची ट्रॉफी?

वीरेंद्र सेहवागने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर ‘रग रग मे भारत’ या कार्यक्रमात बोलताना म्हटले की, “यावेळी भारतीय संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ आशिया चषकात इतर संघांवर दबाव टाकू शकतो. जर भारतीय संघाने आशिया चषकातही आक्रमक खेळ केला, तर भारतीय संघ जेतेपदाची ट्रॉफी उंचावू शकतो.”

भारतीय संघ हा आशिया चषक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. भारतीय संघाच्या नावे सर्वाधिक ८ वेळेस आशिया चषक स्पर्धेची ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम आहे. आगामी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा पाहता या स्पर्धेचे आयोजन टी-२० फॉरमॅटमध्ये केले जाणार आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे.

आशिया चषकासाठी निवडण्यात आलेल्या संघात श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वाल यांना स्थान देण्यात आलेलं नाही. दोघांनीही गेल्या काही मालिकांमध्ये आणि आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे, असं असतानाही दोघांना या संघात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे अनेक दिग्गज खेळाडूंनी नाराजी देखील व्यक्त केली. या संघात सलामीवीर म्हणून शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा यांना संघात स्थान देण्यात आलं आहे. तर वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्या हाती असणार आहे.