नवी दिल्ली : भारतीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओए) खेळाडूंच्या समितीचा सदस्य आणि माजी गोळाफेकपटू ओम प्रकाश कऱ्हानाने मंगळवारी आंदोलक कुस्तीगिरांची बाजू घेत हक्कांसाठी लढणाऱ्या खेळाडूंना न्याय मिळाला हवा असे मत व्यक्त केले. मात्र, कऱ्हानाच्या वक्तव्यामुळे ‘आयओए’मध्येच मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाचे आरोप करताना देशातील आघाडीचे कुस्तीगीर दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करत आहेत. ‘आयओए’च्या अध्यक्ष पीटी उषा यांनी आंदोलक कुस्तीगिरांवर टीका केली होती. कुस्तीगिरांच्या आंदोलनामुळे देशाची प्रतिमा डागाळली असे उषा म्हणाल्या होत्या. परंतु राष्ट्रीय विक्रमवीर व आशियाई विजेता माजी गोळाफेकपटू आणि ‘आयओए’च्या खेळाडूंच्या समितीचा सदस्य कऱ्हानाने कुस्तीगिरांना पािठबा दर्शवला आहे.   

‘‘खेळाडूंना न्याय मिळायला हवा. ते न्यायासाठी लढत आहेत. कुस्तीगिरांनी केलेल्या आरोपांची योग्य चौकशी न झाल्यास खेळाडूंचा न्याय प्रणालीवरील विश्वास उडेल,’’ असे कऱ्हाना म्हणाला.

‘आयओए’ अध्यक्ष उषा यांनी आंदोलनावरून कुस्तिगीरांना धारेवर धरल्यावर कऱ्हानाच्या वक्तव्यामुळे संघटनेतील मतभेद समोर आले आहेत. मात्र, माझे हे वैयक्तिक मत असून मी खेळाडूंच्या समितीचा सदस्य म्हणून बोलत नसल्याचे कऱ्हानाने सांगितले.

‘‘कुस्तीगिरांनी विशेषत: महिला खेळाडूंनी केलेले आरोप गंभीर आहेत. हे प्रकरण योग्य न्याय्य प्रक्रियेद्वारे हाताळले जायला हवे,’’ असेही कऱ्हाना म्हणाला. खेडेगावातून पुढे येत क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय विक्रमापर्यंत मजल मारणाऱ्या कऱ्हानाने या प्रकरणाचे विपरित परिणाम खेळावर होतील अशी भीतीही व्यक्त केली. ‘‘आजही भारतात अनेक गावांतून महिलांना खेळामध्ये कारकीर्द घडविण्याची परवानगी मिळत नाही किंवा त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. लैंगिक शोषणासारख्या घटना घडत असतील, तर त्याचे विपरीत परिणाम भारतीय खेळावर होतील आणि महिलांना खेळापासून दूर ठेवले जाईल,’’ असे मत कऱ्हानाने व्यक्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘राष्ट्रीय शिबिर सुरू करा’

नवी दिल्ली : आघाडीचे कुस्तीगीर आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यातील संघर्षांभोवतीच सध्याची भारतातील कुस्ती केंद्रीत झाली असताना आंदोलनात सहभागी नसलेल्या कुस्तीगिरांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडे (साई) राष्ट्रीय सराव शिबिर तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. सरावासाठीची बहुतेक सर्व कुस्ती केंद्र बंद आहेत. याचा कुस्तीगीरांच्या सरावावर परिणाम होत असून, आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी आवश्यक असलेला सराव होत नाही, असे या कुस्तीगिरांचे म्हणणे आहे.