भारतीय फुटबॉलला नवे परिमाण देऊ पाहणाऱ्या बहुचर्चित आयएमजी-रिलायन्स क्लब फुटबॉल स्पर्धा खेळासाठी उपयुक्त ठरेल, असे मत भारताची माजी फुटबॉलपटू बायच्युंग भुतियाने व्यक्त केले.
खेळाडूंच्या संघटनेचा अध्यक्ष या नात्याने मी खेळाडूंशी या लीगसंदर्भात चर्चा केली. या लीगसाठी खेळाडू सज्ज आहेत. भारतीय फुटबॉलसाठी ही स्पर्धा फायदेशीर असेल असे त्याने पुढे सांगितले. आयलीग स्पर्धा समाधानकारक प्रभाव पाडू शकली नाही. पण ही स्पर्धा प्रेक्षकांना आकर्षित करून, स्थानिक लीगला चालना मिळेल असा विश्वास भुतियाने व्यक्त केला. आय-लीग स्पर्धा प्रामुख्याने बंगाल आणि गोव्यातील क्लबपुरती मर्यादित राहिली. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला नवीन संकल्पना राबवण्यात अपयश आले.
आयपीएलच्या धर्तीवर सुरू होणाऱ्या या स्पर्धेत जगातील अव्वल फुटबॉलपटू सहभागी होणार आहेत ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. या फुटबॉलपटूंचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक नक्की गर्दी करतील, आय-लीगला याच मुद्यावर अपयश आले होते. फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा प्रेरणादायी असेल. आय-लीगमधील एका संघाचा मी मालक आहे. त्यामुळे क्लब स्वरूपाआधारे सुरू होणारी नवी स्पर्धा खेळासाठी चांगली असेल असे भुतियाने पुढे सांगितले. आय-लीगमधील बहुतांशी संघांनी आयएमजी-रिलायन्स स्पर्धेला प्रखरपणे विरोध केला होता.
आय-लीग संघमालक आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघ यांच्यातील मतभेद दूर होणे गरजेचे आहे. खेळाडूंना दोन्ही स्पर्धामध्ये खेळायला मिळणे आवश्यक आहे. मोठय़ा क्लब्जकडे पैसा आहे, मात्र बाकी क्लब्जना प्रायोजकांची वानवा भेडसावत आहे. आय-लीगविजेता संघ चर्चिल ब्रदर्स संघालाही मुख्य प्रायोजक नाही. त्यामुळे आयएमजी-रिलायन्स स्पर्धा होणे उपयुक्त ठरणार आहे. या स्पर्धेसाठी करारबद्ध करण्यात आलेले ३८ खेळाडू राष्ट्रीय संघात स्थान मिळवू शकतात असे भुतियाने स्पष्ट केले.