झिम्बाब्वेचा माजी कर्णधार ब्रेंडन टेलरने ट्विटरवर एक निवेदन जारी करून ब्लॅकमेलिंगची धक्कादायक घटना शेअर केली आहे. ”स्पॉट-फिक्सिंग सामन्यांबद्दल एका भारतीय व्यावसायिकाने मला ब्लॅकमेल केले होते आणि आता चार महिन्यांच्या विलंबाने त्याचा अहवाल दिल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) अनेक वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागत आहे”, असे टेलरने सांगितले.

सप्टेंबर २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या टेलरने सांगितले, की प्रायोजकत्व आणि झिम्बाब्वेमध्ये एका टी-२० स्पर्धेच्या संभाव्य प्रक्षेपणावर चर्चा करण्यासाठी त्याला ऑक्टोबर २०१९च्या उत्तरार्धात भारतात आमंत्रित करण्यात आले होते. हा दौरा करण्यासाठी टेलरला १५,००० अमेरिकन डॉलर पैसे दिले जाणार होते.

टेलरने ट्विटरवर म्हटले, “मी थोडा सावध होतो, हे मी नाकारू शकत नाही. परंतु वेळ अशी होती की आम्हाला झिम्बाब्वे क्रिकेटने सहा महिन्यांपासून पैसे दिले नव्हते, म्हणून मी दौरा केला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे चर्चा सुरू झाल्या आणि हॉटेलमध्ये शेवटच्या रात्री व्यावसायिक आणि त्यांचे सहकारी मला एका डिनरसाठी घेऊन गेले.”

हेही वाचा – IND vs SA : ऋषभ पंतचा ‘बेजाबदारपणा’ पाहून विराट संतापला; रागात दिली ‘अशी’ Reaction; पाहा VIDEO

“आम्ही मद्यपान केले आणि संध्याकाळी त्याने मला कोकेन दिली, ते सर्वजण घेत होते आणि मी मूर्खपणाने ते घेतले. तेव्हापासून मी ही नशा लाखो वेळा केली आहे. दुसर्‍या दिवशी सकाळी तोच माणूस माझ्या खोलीत आला आणि मी कोकेन घेत असल्याचा व्हिडिओ त्याने मला दाखवला. त्याने मला सांगितले, की जर मी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्यासाठी स्पॉट-फिक्सिंग केले नाही, तर तो व्हिडिओ शेअर करेल. यासाठी मला पैसे मिळणार होते, भारत सोडण्यासाठी मी ते पैसे घेतले. पण त्याची मागणी पूर्ण केली नाही. मी कधीही स्पॉट फिक्सिंगमध्ये सामील झालो नाही. परंतु या घटनेमुळे माझ्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. आयसीसीशी संपर्क साधण्यासाठी मला चार महिने लागले, पण त्यांना या विलंबाचे कारण समजेस अशी आशा आहे”, असा खुलासा टेलरने केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टेलरने झिम्बाब्वेसाठी २००४ मध्ये बुलावायो येथे श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले आणि काही वेळातच तो संघाचा स्टार खेळाडू बनला. त्याने २०५ सामन्यांमध्ये ११ एकदिवसीय शतकांसह ६६८४ धावा केल्या. त्याने ३४ कसोटीत २३२० धावा आणि ४५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ९३४ धावा केल्या.