स्पर्धा म्हटली की शर्यत आलीच आणि खेळ म्हटल्यावर धोके हे आलेच. बुद्धिबळ, कॅरमसारख्या बैठय़ा खेळांचा अपवाद वगळला तर शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या अनेक खेळांमध्ये धोके हे आलेच. या धोक्यांमुळेच खेळाडूंना आपल्या प्राणाची बाजी लावावी लागते. फॉम्र्युला-वन हा सर्वाधिक धोके असणारा खेळ. सुरुवातीच्या काळात अनेक ड्रायव्हर्सचे प्राण फॉम्र्युला-वन या खेळाने घेतले आहेत, पण तरीही या k02खेळातील रंगत आणि स्पर्धा कमी झालेली नाही. गेल्या आठवडय़ात जपान ग्रां. प्रि. शर्यतीदरम्यान मॉरुसिया संघाचा ड्रायव्हर ज्युलेस बिआंचीला झालेल्या अपघातानंतर सध्या ड्रायव्हर्सच्या सुरक्षिततेविषयी चर्वितचर्वण सुरू आहे. तद्दन व्यावसायिकपणा जपणाऱ्या आणि या अपघाताचे सोयरसुतक नसलेल्या फॉम्र्युला-वन सर्कशीचा तंबू आता रशियामध्ये सरकला आहे. बिआंची सध्या मृत्यूशी झुंज देत असला तरी त्याचे सहकारी मात्र ठामपणे त्याच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
फॉम्र्युला-वनच्या पहिल्या दिवसापासूनच गंभीर अपघात आणि ड्रायव्हर्सचा मृत्यू अशा घटना घडू लागल्या. फक्त ड्रायव्हर्सच नव्हे तर सुरक्षारक्षक आणि चाहत्यांना प्राण गमवावे लागल्यानंतर या खेळात सुधारणेच्या बाबतीत आमूलाग्र बदल घडून आले. १९९४मध्ये महान ड्रायव्हर्स आर्यटन सेन्नाच्या मृत्यूनंतर मात्र सुरक्षेच्या बाबतीत बऱ्याच सुधारणा घडून आल्या. मात्र प्रत्येक मोसमाच्या सुरुवातीला सुरक्षेचे नियम जसे बदलतात, तसतसा कारचा वेगही वाढत आहे. त्यामुळे कितीही सुरक्षा बाळगली तरी सुसाट वेगाने कार k03चालवताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. २००९मध्ये फेलिपे मासाच्या जीवघेण्या अपघातानंतर आता ज्युलेस बिआंचीच्या अपघाताची चर्चा सध्या सुरू आहे. हा अपघात टाळता आला असता, यावर सर्वाचा खल सुरू आहे. खरे तर, गेल्या रविवारी जपानमध्ये अतिवृष्टी आणि पावसाचा इशारा देण्यात आला होता. शर्यतीला सुरुवात होण्याआधी मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट असा निसर्गाचा तांडव सुरू होता. त्यातच पूर्वनियोजित वेळेवर शर्यतीला सुरुवात करण्यात आली. शर्यतीच्या शेवटी अंधार पडू लागल्याने तसेच मुसळधार पावसामुळे समोरचा ट्रॅक दिसू न लागल्यामुळे ४०व्या टप्प्यानंतर एड्रियन सुटीलच्या गाडीला अपघात झाला. त्याची कार ट्रॅकवरून बाहेर काढण्यासाठी सव्‍‌र्हिस ट्रॅक्टर मागवावा लागला. पण याच वळणावर पुढच्या टप्प्यादरम्यान मॉरुसियाच्या बिआंचीची कार थेट ट्रॅक्टरला जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की बिआंचीला थेट रुग्णालयात दाखल करावे लागले. पण वातावरण ढगाळ असल्यामुळे हेलिकॉप्टरऐवजी रुग्णवाहिकेचा वापर करावा लागला. ही शर्यत सुरू असताना समांतर ट्रॅकवर सव्‍‌र्हिस ट्रॅक्टर आणण्याची परवानगी नसते. पण संकट यायचे म्हटले की ते कोणत्याही मार्गाने येते. बिआंचीच्या बाबतीत असेच घडले. सायंकाळी पाच वाजता शर्यत सुरू झाल्यानंतर अखेरच्या क्षणी अंधार पडणार, याचा विचार आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघाने केला नव्हता का? निसर्गाच्या रुद्रावताराचा अंदाज घेता, ही शर्यत दोन तास आधी घेता आली असती तर अपघात टाळता आला असता, यावर सर्वाचेच एकमत होत आहे. पण व्यावसायिकपणा, पुरस्कर्त्यांचा दबाव आणि नुकसानाच्या भीतीपोटी फॉम्र्युला-वनला ही शर्यत रद्द करणे शक्य होते का? बिघडलेल्या वातावरणातही लढाऊ बाणा जपण्याची खरोखरच गरज होती का? असे असंख्य प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.
शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारे खेळ हे खेळाडूंसाठी सुरक्षित आहेत का? फक्त फॉम्र्युला-वनच नव्हे तर अन्य खेळांतही प्राण गमवावे लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. फुटबॉल खेळत असताना हृदयविकाराचा झटका येऊन किंवा चाहत्यांच्या मारहाणीत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. क्रिकेटसारख्या सुरक्षित खेळातही भारताच्या रमण लांबा यांना फॉरवर्ड शॉर्टलेगला क्षेत्ररक्षण करत असताना डोक्याला चेंडू लागून आपले प्राण गमवावे लागले होते. असे असताना मग फॉम्र्युला-वनमधील ड्रायव्हर्सच्या सुरक्षेच्या बाबतीतच का टाहो फोडला जात आहे.
२००९मध्ये फेरारीचा ड्रायव्हर फेलिपे मासाला गंभीर अपघाताला सामोरे जावे लागले होते. हेल्मेटच्या चिंधडय़ा झाल्यानंतरही मासा या अपघातातून बालंबाल बचावला होता. त्यानंतर त्याने दोन वर्षांतच फॉम्र्युला-वनमध्ये पुनरागमनही केले होते. सध्या विल्यम्स संघाकडून त्याची कामगिरीही चांगली होत आहे. पण बिआंची तितका सुदैवी ठरला नाही. अपघातानंतर डोक्याला जबर मार बसल्यामुळे बिआंची सात दिवसांनंतर अजूनही बेशुद्धावस्थेत आहे. त्याच्या तब्येतीत तसूभरही फरक पडलेला नाही. त्याच्या मेंदूला इजा झाल्याचे डॉक्टरांचे निदान असून तो पुन्हा नियमित आयुष्य जगण्याची शक्यता फारच कमी आहे. या आजारामुळे तो आयुष्यभरासाठी कोमात जाऊ शकतो. या आजारातून ९० टक्के रुग्ण बेशुद्धावस्थेतून बाहेर पडलेच नाहीत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे बिआंचीसारख्या उदयोन्मुख आणि युवा ड्रायव्हर्सची उणीव फॉम्र्युला-वनमध्ये नक्कीच जाणवेल, अशी चिन्हे दिसत आहेत.
या अपघातामुळे रविवारी होणाऱ्या रशियन ग्रां. प्रि. शर्यतीवर टांगती तलवार असली तरी ‘शो मस्ट गो ऑन’ ही फॉम्र्युला-वनची परंपरा कायम राहणार आहे. या शर्यतीत बिआंचीच्या मॉरुसिया संघाने मात्र एकच कार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. फॉम्र्युला-वनमध्ये अपघातांची मालिका अशीच सुरू राहणार, की सुरक्षेच्या बाबतीत फॉम्र्युला-वन महासंघ यापुढेही मूग गिळून गप्प राहणार का, हा प्रश्न आता सर्वाना सतावत आहे.