वृत्तसंस्था, पॅरिस : दुसरा मानांकित डॅनिल मेदवेदेव्ह, चौथा मानांकित स्टेफानोस त्सित्सिपास आणि स्पेनचा प्रतिभावान खेळाडू कार्लोस अल्कराझ यांनी शनिवारी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तसेच महिलांमध्ये अव्वल खेळाडू इगा श्वीऑनटेकने आगेकूच केली. पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत मेदवेदेव्हने सर्बियाच्या मिमोर केस्मानोव्हिचला ६-२, ६-४, ६-२ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. पुढील फेरीत त्याच्यापुढे २०व्या मानांकित मरीन चिलिचचे आव्हान असेल. चिलिचने फ्रान्सच्या गिल्स सायमनचा ६-०, ६-३, ६-२ असा धुव्वा उडवत पुढील फेरी गाठली.  

तसेच गतउपविजेत्या त्सित्सिपासने स्वीडनच्या मिकाइल यमेरला ६-२, ६-२, ६-१ अशी धूळ चारली. सहाव्या मानांकित अल्कराझने अमेरिकेच्या सेबॅस्टियन कोर्डाचा ६-४, ६-४, ६-२ असा सहज पराभव केला. सातव्या मानांकित आंद्रे रुब्लेव्हने चिलीच्या ख्रिस्टियन गारिनला ६-४, ३-६, ६-२, ७-६ (१३-११) असे नमवले.

महिला एकेरीत श्वीऑनटेकने मॉन्टेनेग्रोच्या डांका कोव्हिनिचचे आव्हान ६-३, ७-५ असे परतवून लावत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. तसेच अमेरिकेच्या ११व्या मानांकित जेसिका पेगुलाने स्लोव्हेनियाच्या तमारा झिदानसेकचा ६-१, ७-६ (७-२) असा पराभव केला. तिसऱ्या मानांकित पॉला बदोसाला मात्र तिसऱ्या फेरीच्या सामन्यात दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. व्हेरॉनिका कुदेर्मेतोव्हा हिच्याविरुद्धच्या सामन्यात तिने पहिला सेट ३-६ असा गमावला. मग दुसऱ्या सेटमध्ये १-२ अशी पिछाडीवर असताना तिने सामना सोडला.  

बोपण्णा-मिडलकूपचा धक्कादायक विजय

पुरुष दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत भारताच्या रोहन बोपण्णाने नेदरलँड्सच्या मातवे मिडलकूपच्या साथीने खेळताना धक्कादायक विजय नोंदवला. बोपण्णा-मिडलकूप जोडीने क्रोएशियाच्या निकोला मेकटिच व मेट पाव्हिच जोडीवर ६-७ (५-७), ७-६ (७-३), ७-६ (१२-१०) अशी मात केली. तसेच महिला दुहेरीत भारताची सानिया मिर्झा आणि तिची चेक प्रजासत्ताकची साथिदार लुसी हरादेकाने काया जुव्हान आणि तमारा झिदानसेकला ६-३, ६-४ असे नमवत तिसरी फेरी गाठली.