भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच टी-२० विश्वचषकात विजय मिळविल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपली निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर बीसीसीआय मुख्य प्रशिक्षकपदाच्या शोधात होती. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर या पदासाठी इच्छुक होता. त्यासाठी त्याने मुलाखतही दिली होती. आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्याचे जाहीर केले आहे. गौतम गंभीरचा कार्यकाळ जुलै २०२४ पासून सुरू होत आहे. तो डिसेंबर २०२७ पर्यंत या पदावर राहिल. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांकरिता प्रशिक्षकपदाची जबाबदारी त्याच्यावर राहणार आहे.

जय शाह यांनी एक्सवर पोस्ट करत ही बातमी दिली आहे. त्यात ते म्हणाले, “भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपदासाठी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचे नाव जाहीर करताना मला आत्यंतिक आनंद होत आहे. आधुनिक काळातील क्रिकेट झपाट्याने बदलले आहे आणि गौतम या बदलांचा साक्षीदार राहिला आहे. गौतमने त्याच्या कारकिर्दीत अनेक भूमिका वठविल्या आहेत. त्याने आजवर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तो यापुढे भारतीय संघालाही पुढे नेईल. तसेच हे करण्यासाठी तो आदर्श व्यक्ती वाटतो.”

नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, अमित शाह यांच्या नावाने भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज, वाचा काय घडलं

“गौतम गंभीरची दूरदृष्टी आणि त्याचा अफाट अनुभव त्याला मुख्य प्रशिक्षकपदासाठी योग्य दावेदार ठरवतो. बीसीसीआयकडून गौतम गंभीरच्या या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा”, अशा शब्दांत जय शाह यांनी गौतम गंभीरचे स्वागत केले आहे.

बीसीसीआयच्या घोषणेनंतर गौतम गंभीरनेही एक्सवर पोस्ट टाकून या निर्णयाबद्दल पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

“भारत ही माझी ओळख आहे आणि देशाची सेवा करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अभिमानाचा क्षण आहे. भलेही माझ्या डोक्यावर वेगळी टोपी असेल, पण मी आता भारतीय संघाचा पुन्हा एकदा भाग झालो, याचा आनंद वाटतोय. प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटेल, असे काम करणे, हेच यापुढेही माझे ध्येय असेल. निळ्या जर्सीतील खेळाडू १४० कोटी जनतेचे स्वप्न आपल्या खांद्यावर घेतात. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला जे काही करता येईल, ते करण्याचा मी प्रयत्न करेन”, अशी भावना गौतम गंभीरने व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोव्हेंबर २०२३ मध्ये भारतीय संघाचा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपली निवृत्ती घेण्याची इच्छा जाहीर केली होती. मात्र कर्णधार रोहित शर्माच्या विनंतीनंतर त्यांनी टी-२० विश्वचषकापर्यंत प्रशिक्षक पदावर राहण्याचे मान्य केले. २९ जून रोजी बार्बाडोसच्या मैदानावर भारतीय क्रिकेट संघाने तब्बल ११ वर्षानंतर आयसीसी चषक जिंकत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला एक उत्तम भेट दिली.

बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकपदासाठी घातल्या कठोर अटी

  • किमान ३० कसोटी सामने किंवा ५० एकदिवसीय सामन्यांचा अनुभव.
  • किंवा किमान दोन वर्षे पूर्ण वेळ कसोटी खेळणाऱ्या देशाचा मुख्य प्रशिक्षक असणे आवश्यक आहे.
  • किंवा कोणत्याही असोसिएट सदस्य संघाचा/कोणत्याही आयपीएल संघाचा किंवा अशा कोणत्याही लीग किंवा प्रथम श्रेणी संघाचा किंवा कोणत्याही
  • देशाच्या अ संघाचा तीन वर्षे प्रशिक्षक असण्यचा अनुभव.
  • किंवा बीसीसीआयचे लेव्हल-3 कोचिंग प्रमाणपत्र धारक असले पाहिजे.
  • वय ६० वर्षांपेक्षा कमी असावे.