आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्सच्या संघाने मुंबई इंडियन्सला नमवत १ जूनला अंतिम फेरीत धडक मारली. पंजाब किंग्सचा संघ तब्बल ११ वर्षांनंतर अंतिम सामना खेळणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील संघाने संपूर्ण सीझनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत फायनल गाठली. पण त्याच्या दुसऱ्या दिवशीच संघाच्या अष्टपैलू खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

एकहाती संघाला विजय मिळवून देणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलने अचानक वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पोस्ट शेअर करत या निवृत्तीची घोषणा केली आहे. १ जूनला पंजाब किंग्सचा संघाने अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर २ जून रोजी मॅक्सवेलच्या निवृत्तीची पोस्ट पडली.

मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाकडून शेवटचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता. त्या स्पर्धेनंतर स्टीव्ह स्मिथनेही वनडेमधून निवृत्तीची घोषणा केली. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर, तो आयपीएल २०२५ मध्ये दिसला, परंतु दुखापतीमुळे काही सामन्यांनंतर तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला.

२०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा ग्लेन मॅक्सवेल याच्या नावे दोन वनडे वर्ल्डकप आहेत. त्याने १४९ एकदिवसीय सामन्यांमध्ये जवळपास ४ हजार धावा केल्या आहेत, तर गोलंदाज म्हणून त्याच्या नावे ७९ विकेट्स आहेत. मॅक्सवेल हा उत्कृष्ट ऑफ-स्पिनर आहे, तर फलंदाजीत एकट्याच्या बळावर त्याने संघाला विजय मिळवून दिला आहे. तो ऑस्ट्रेलियासाठी एक मोठा मॅचविनर खेळाडू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्लेन मॅक्सवेलने फायनल वर्ड पॉडकास्टवर बोलताना म्हणाला, “परिस्थितीनुसार शरीर साथ देत नसल्याने मी माझ्या कामगिरीने संघाला थोडं निराश करत आहे, असं मला वाटतंय. ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांच्याशी मी चर्चा केली आणि त्यांना पुढील वाटचालीबद्दल त्यांचे काय विचार आहेत असे विचारले. आम्ही २०२७ च्या विश्वचषकाबद्दल बोललो आणि मी त्यांना सांगितले की मला वाटत नाही की मी तो वर्ल्डकप खेळू शकेन, आता माझ्या जागी येणाऱ्या इतर खेळाडूंसाठी नियोजन करण्याची वेळ आली आहे जेणेकरून ते या क्रमांकावर खेळून ते स्वतःचे स्थान बनवू शकतील. आशा आहे की त्यांना ही भूमिका बजावण्यासाठी पुरेशा संधी मिळतील.”