निवासस्थानाच्या कायमस्वरूपी पत्त्यावरून अपात्र ठरवत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी केलेला उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिवाणी न्यायालयात आव्हान दिले आहे. निवडणुकीपासून दूर ठेवण्याच्या हेतूनेच आपल्याला अपात्र ठरविण्यात आल्याचा आरोप करीत एमसीएच्या अध्यक्षपदाची निवडणूक बेकायदा ठरवून रद्द करण्याची आणि ती नव्याने घेण्याची मागणी मुंडे यांनी केली आहे. उद्या, शनिवारी त्यावर सुनावणी होणार आहे.
पवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली असली तरी त्यांना पदाची सूत्रे घेऊ न देण्याची मागणीही मुंडे यांनी केली आहे. मुंडे यांनी आपल्या दाव्यामध्ये एमसीएचे मावळते अध्यक्ष रवी सावंत, सहसचिव नितीन देसाई, पी. व्ही. शेट्टी, सी. टी. सिंघवी, निवडणूक अधिकारी एस. एम. गोरवाडकर यांना प्रतिवादी केले आहे.
पवारांना निवडणूक लढविता यावी याचसाठी निवडणुकीची प्रक्रिया तीन महिने उशिराने सुरू केल्याचा दावा मुंडे यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनाही २०११ च्या निवडणुकीच्या वेळेस मुंडे यांच्याप्रमाणेच अपात्र ठरविण्यात आले होते. परंतु विलासरावांनी त्या निर्णयाला आव्हान दिले. त्या वेळी त्यांनी आपल्या निवासस्थानाचा कायमस्वरूपी पत्ता हा मुंबईच असल्याचा पुरावा म्हणून पारपत्र, पॅनकार्ड, वीजदेयक आदी कागदपत्रे सादर केली होती. त्या वेळी निवडणूक अधिकाऱ्याने त्यांच्या बाजूने निर्णय दिल्याने त्यांनी निवडणूक लढवली होती. आता याच मुद्दय़ावरून मुंडे यांना अपात्र ठरविण्यात आले आहे आणि त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळून लावला आहे. देशमुखांप्रमाणे मुंडे यांनीही उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाविरोधात अपिल केले होते. तसेच मुंबईच सध्या निवासस्थानाचा कायमस्वरुपी पत्ता असल्याचे सांगणारी कागदपत्रे सादर केली होती. मात्र त्यानंतरही निवडणूक अधिकाऱ्याने त्यांचे अपिल फेटाळून लावले. निवडणूक अधिकारी एकाच मुद्दय़ावर दोन परस्परविसंगत निर्णय कसे काय देऊ शकतात, असा सवाल करीत निवडणूक अधिकाऱ्याचा निर्णय बेकायदा ठरविण्याची मागणी मुंडे यांनी दाव्यामध्ये केली आहे. तसेच अध्यक्षपदाची संपूर्ण निवडणूक नव्याने घेण्याची आणि तोपर्यंत पवार यांना पदाची सूत्रे घेण्यास अटकाव करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी केली आहे.