श्रीलंका क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपेल यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. या पदाच्या निवडीची मुदत महिन्याअखेपर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती श्रीलंकेतील सूत्रांनी दिली. परंतु सध्या तरी चॅपेल यांचे पारडे जड दिसत आहे. चॅपेल यांचा एके काळी जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून नावलौकिक होता. २००७च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत भारताची कामगिरी खराब झाली. त्यानंतर चॅपेल यांना भारताचे प्रशिक्षकपद सोडावे लागले. भारताचे माजी कप्तान सौरव गांगुली यांच्याशी असलेला त्यांचा वाद तर सर्वाना माहीत आहे. चॅपेल यांच्याशिवाय शेन डफ आणि मायकेल ओ’सुल्लिव्हान या दोन ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांची नावेही अंतिम यादीत आहेत. वेंकटेश प्रसाद, लालचंद रजपूत आणि मोहित सोनी ही तीन भारतीय नावेही या शर्यतीत आहेत.