मेलबर्न : ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत बिगरमानांकित खेळाडूंकडून मातब्बरांना धक्के मिळण्याची मालिका सोमवारीही कायम राहिली. जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जाणारी द्वितीय मानांकित अरिना सबालेंका आणि १४वी मानांकित सिमोना हॅलेप यांना सोमवारी या ग्रँडस्लॅम स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला, तर काया कॅनेपी आणि एलिझ कॉर्ने या बिगरमानांकितांनी प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली.

महिला एकेरीतील लढतीत इस्टोनियाच्या कॅनेपीने बेलारुसच्या सबालेंकावर ५-७, ६-२, ७-६ (१०-७) असे तीन सेटमध्ये वर्चस्व मिळवले. कॅनेपीला उपांत्यपूर्व सामन्यात पोलंडच्या सातव्या मानांकित इगा श्वीऑनटेकशी दोन हात करावे लागतील. श्वीऑनटेकने रोमानियाच्या सोराना क्रिस्टीला ५-७, ६-३, ६-३ असे नमवले.

अन्य लढतीत फ्रान्सच्या ३२ वर्षीय कॉर्नेने रोमानियाच्या हॅलेपविरुद्ध ६-४, ३-६, ६-४ असे यश संपादन केले. एकूण १७व्यांदा ऑस्ट्रेलियन स्पर्धेत खेळणाऱ्या कॉर्नेने प्रथमच एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे.

त्सित्सिपास, मेदवेदेवची आगेकूच

पुरुष एकेरीत ग्रीसचा चौथा मानांकित स्टेफानोस त्सित्सिपास आणि रशियाचा द्वितीय मानांकित डॅनिल मेदवेदेव यांनी संघर्षपूर्ण विजयासह उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.