क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. खुद्द हरभजन सिंग याने राजकारणातील प्रवेशासंबंधीचे वृत्त फेटाळून लावले आहे. राजकारणात प्रवेश करण्याचा माझा कोणताही इरादा नाही. कृपया अफवा पसरविणे बंद करा, असे ट्विट हरभजन सिंग याने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून केले आहे.

हरभजन सिंग लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली होती. हरभजन जालंधरमधून पंजाब विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती ‘इंडिया टुडे’ने दिली होती. गेल्या काही दिवसांपासून हरभजन सिंग पंजाबमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते अमरिंदर सिंग यांच्या संपर्कात असल्याचेही सांगितले जात होते. त्यामुळे हरभजन राजकारणाच्या खेळपट्टीवर उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

तत्पूर्वी मंगळवारी नवज्योतसिंग सिद्धू यांनी नवी दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल ४५ मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू हेदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. यापूर्वी क्रिकेटच्या मैदानात वादग्रस्त राहिलेला भारतीय संघाचा माजी गोलंदाज श्रीशांत यानेदेखील राजकारणात प्रवेश केला होता. मात्र, भाजपच्या तिकीटावर केरळ विधानसभेत लढणाऱया श्रीशांतला पराभवाला सामोरे जावे लागले होते.