Hardik Pandya To Be Mumbai Indians Captain: इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये गुजरात टायटन्स (GT) ला सर्वात दमदार संघ म्हणून ओळख मिळवून देणारा अष्टपैलू हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स (MI) मध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएल, मुंबई इंडियन्स व हार्दिक पांड्या अशा तिन्ही सोशल मीडिया पेजेसवर याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार यापूर्वी पांड्याने सात आयपीएल हंगामांसाठी मुंबई इंडियन्ससोबत करार केला होता, २०२२ च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने त्याला रिलीज केले होते. गुजरात टायटन्सचे त्यांच्या पदार्पणाच्या वर्षातच पांड्याकडे नेतृत्वाची संधी सोपवली होती. गेल्या वर्षी याच अष्टपैलू स्टारने गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून दिले. त्याच्या नेतृत्वाखाली, गुजरात टायटन्सने MS धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध IPL 2023 ची अंतिम लढत देखील केली.
दरम्यान आता पाच वेळा आयपीएल जिंकलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाने गुजरात टायटन्सला हार्दिक पांड्यासाठी १५ कोटी रुपये देत आता स्टार खेळाडूला पुन्हा संघात आणले आहे. अंतिम मुदतीच्या दिवसापूर्वी दोन्ही संघांमधील या महत्त्वपूर्ण कराराविषयी बोलताना भारताचे माजी सलामीवीर कृष्णमाचारी श्रीकांत म्हणाले की, पांड्या हा आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी मोठा बोनस असेल.
श्रीकांत यांनी युट्युबवर याविषयी मत मांडताना सांगितले की, “गुजरात टायटन्स आपल्या कर्णधारालाच कसे काय रिलीज करत आहे हे एक मोठं आश्चर्य आहे, पण मुंबई इंडियन्सला याचा खूप फायदा होऊ शकतो. मुंबईला एका अष्टपैलू खेळाडूची गरज होतीच. जेव्हा असे व्यवहार होतात तेव्हा अनेकदा हाच प्रश्न पडतो की कदाचित संघाचे मालक हे या सगळ्याकडे एक व्यवसाय म्हणूनच पाहत असतील. जेव्हा पांड्या गुजरातचा कर्णधार होता तेव्हा त्यांनी विजेतेपद जिंकले आहे, दोन वेळा अंतिम फेरी गाठली आहे.”
दरम्यान, माजी भारतीय फलंदाजाने असे मत व्यक्त केले की कदाचित आता मुंबई इंडियन्सचा संघाचा पुढील कर्णधार म्हणून पांड्याचे नाव घेतले जाऊ शकते. मात्र, रोहित हा मुंबई इंडियन्सचा अविभाज्य भाग राहील. पण ज्याप्रकारे सचिन आणि रोहित यांच्यावेळी नेतृत्व एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर पुढे सरकवण्यात आलं तीच वेळ कदाचित आता रोहित आणि हार्दिकच्या बाबत आली आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने एमआयला पाच वेळा आयपीएल जेतेपदाचा मुकुट मिळवून दिला आहे. भारताचा कर्णधार रोहितने जगातील सर्वात श्रीमंत T20 लीगमध्ये २४३ सामने खेळले आहेत.
मात्र हे सगळं सोप्या पद्धतीने होण्याची गरज आहे. जे काम धोनीने भारतीय कर्णधारपद विराट कोहलीकडे सोपवताना केले तसेच होणे आवश्यक आहे. धोनी तेव्हा कोहलीच्या हाताखाली खेळला होता, ही एकप्रकारे गुरु-शिष्याचीच जोडी होती. रोहित आणि हार्दिकच्या बाबत असे व्हायला हवे जिथे सहजपणे हार्दिक संघाचे नेतृत्व करेल आणि रोहित संघ सांभाळेल.