Hardik Pandya New Look: आशिया चषक २०२५ स्पर्धेला येत्या ९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या लढतीत हाँगकाँग आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ भिडणार आहेत. या स्पर्धेत ८ संघ जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आगामी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा पाहता ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत तुम्हाला चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. भारताचा संघ पहिल्या लढतीत युएईचा सामना करणार आहे. या सामन्यात हार्दिक पांड्या मोठे फटके खेळताना दिसू शकतो. दरम्यान या सामन्याआधीच तो आपल्या नवीन लुकमुळे चर्चेत आला आहे.

आपल्या हटके लुकमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या हार्दिक पांड्याने आशिया चषकापूर्वी नवीन हेअरकट केला आहे. यावेळी त्याने आपल्या केसांना सँडी ब्लॉन्ड रंग लावला आहे. हा नवीन लुक हार्दिक पांड्याला चांगलाच सुट होत आहे. नेहमी कुल दिसणारा हार्दिक पांड्या या नव्या लुकमुळे आणखी जास्त कुल दिसू लागला आहे. हार्दिकने आपल्या हेअर स्टाईलचे फोटो आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. दरम्यान फोटो अपलोड होताच, तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

हार्दिक पांड्या जेव्हा मैदानावर असतो, तेव्हा तो आपल्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जातो. मोठ मोठे फटके खेळणं हे त्याच्या उजव्या हाताचा खेळ आहे. तसेच संघाला गरज असताना गोलंदाजीत विकेट्स काढून देणंही त्याला चांगलच जमतं. त्यामुळे त्याला सर्वगुण संपन्न अष्टपैलू खेळाडू म्हटलं जातं. आयपीएल स्पर्धेत रोहितचा उत्तराधिकारी म्हणून त्याच्याकडे मुंबई इंडियन्स संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता आशिया चषकाआधी त्याच्या नव्या लुकचा फोटो व्हायरल होताच, पुन्हा एकदा हार्दिक पांड्याची चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. यावरून हे स्पष्ट होतंय की, हार्दिक केवळ मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेर देखील फॅशनच्या बाबतीत हिरो आहे.

आशिया चषकात असेल मोठी जबाबदारी

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील अंतिम सामन्यात निर्णायक षटक टाकून भारतीय संघाला विजय मिळवून देणाऱ्या हार्दिक पांड्यावर आशिया चषकातही मोठी जबाबदारी असणार आहे. यावेळी रविंद्र जडेजा संघाचा भाग नसणार आहे. त्यामुळे हार्दिकला फलंदाजीसह गोलंदाजीतही योगदान द्यावं लागणार आहे. हार्दिककडे कुठल्याही क्रमांकावर फलंदाजीला येऊन मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. यासह तो पूर्णवेळ गोलंदाज म्हणून ४ षटकं गोलंदाजी देखील करू शकतो.