ICC Punishes Haris Rauf and Sahibzada Farhan: आशिया चषक २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान संघांमधील सामन्यांमध्ये मोठे वाद पाहायला मिळाले होते. भारतीय संघातील खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंनी मैदानावर सामना सुरू असताना आक्षेपार्ह हावभाव केले. हारिस रौफ साहिबजादा फरहान या खेळाडूंच्या वर्तनाबाबत बीसीसीआयने आयसीसीकडे तक्रार केली होती. यानंतर हारिस रौफवर आयसीसीने आता कारवाई केली आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यांदरम्यानच्या वादामुळे क्रिकेट जगतात सातत्याने चर्चा सुरू आहेत. दोन्ही क्रिकेट बोर्डांनी एकमेकांच्या खेळाडूंविरुद्ध आयसीसीकडे तक्रारी दाखल केल्या. सूर्यकुमार यादव २५ सप्टेंबर रोजी आयसीसीच्या सुनावणीला उपस्थित राहिला. दरम्यान, बीसीसीआयने साहिबजादा फरहान आणि हरिस रौफ यांच्याविरुद्ध आयसीसीकडे तक्रार दाखल केली आणि आयसीसीने आता यावर महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे.
भारताविरुद्धच्या सुपर फोर सामन्यादरम्यान साहिबजादा फरहान आणि हरिस रौफ यांनी आक्षेपार्ह हावभाव केले होते. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर फरहानने बंदुकीने सेलिब्रेशन केलं, तर हरिस रौफने विमान क्रॅश झाल्याचे सातत्याने हावभाव केले.
परिणामी, आक्षेपार्ह हावभाव आणि चुकीच्या वर्तनासाठी आयसीसीने हरिस रौफला त्याच्या मॅच फीच्या ३० टक्के दंड ठोठावला आहे. दरम्यान, फलंदाज साहिबजादा फरहानला त्याच्या “बंदुकीच्या” सेलिब्रेशनसाठी समज देऊन सोडून देण्यात आले.
हारिस रौफवर भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यासाठी बंदी घातली?
रौफची मैदानावरील कृती ही खेळभावनेविरुद्ध होती, ज्यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला. भारताच्या फलंदाजी दरम्यान त्याने “६-०” हावभाव आणि लढाऊ विमान क्रॅश झाल्याचा इशारा केला, जो भारतीय संघाला संवेदनशील आणि चिथावणीखोर वाटला. आयसीसीने या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर रौफला त्याच्या वर्तनाबद्दल शिक्षा देण्याचा निर्णयही घेतला. पण हरिस रौफवर बंदी घालण्यात आलेली नाही. त्यामुळे तो भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्यात सहभागी होऊ शकेल.
आशिया चषकात पहिल्यांदाच होणार भारत-पाकिस्तान सामना
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० आशिया चषक २०२५ मधील अंतिम सामना २८ सप्टेंबरला खेळवला जाईल. आशिया चषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ भिडणार आहेत. १९८४ नंतर म्हणजेच ४१ वर्षांच्या या स्पर्धेच्या इतिहासात हे दोन्ही संघ फायनलमध्ये भिडताना दिसतील.