Harleen Deol Shocked PM Narendra Modi of Skincare Routine Question: वर्ल्ड चॅम्पियन महिला संघाने विश्वचषक जेतेपदानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी त्यांची खास भेट घेतली. भारतीय संघासह संपूर्ण कोचिंग व सपोर्ट स्टाफ, तसेच बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मन्हासदेखील उपस्थित होते. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी सर्वांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. पण यादरम्यान हरलीन देओलने असा पंतप्रधानांना असा प्रश्न विचारला की सर्वजण चकित झाले आणि खुद्द नरेंद्र मोदीही हसताना दिसले.

भारतीय संघाच्या भेटीदरम्यान पंतप्रधान संघातील खेळाडूंना त्यांच्या कामगिरीविषयी मैदानावरील एखाद्या प्रसंगांविषयी प्रश्न विचारत होते. पण हरलीन देओलने खुद्द पंतप्रधानांना प्रश्न विचारत त्यांना क्लीन बोल्ड केलं. पंतप्रधान मोदींशी चर्चेदरम्यान त्यांंचं स्किनकेअर रूटीन काय असं विचारलं, तुम्ही फार ग्लो करताय यामागचं रहस्य काय असं तिने विचारलं. तिने हा प्रश्न विचारताच एकदमच हशा पिकला आणि मोदीही चकित झाले.

हरलीन देओलने स्किनकेअर रूटीन प्रश्न विचारताच पंतप्रधानांना केलं क्लीन बोल्ड

हरलीन देओल म्हणाली, “सर मला तुमचं स्किनकेअर रूटीन विचारायचं आहे. तुमचा चेहरा फार ग्लो करतोय.” हरलीनचा प्रश्न ऐकून सर्वजण तोंडावर हात ठेवून चकित होत हसू लागले. तर मोदींनी थेट डोक्याला हातच लावला, पंतप्रधान तिच्या प्रश्नावर काय उत्तर देऊ आता या विचारात काही सेकंद डोक्याला हात लावून बसून राहिले. तितक्यात स्नेह राणा म्हणते ‘करोडो जनतेचं प्रेम आहे सर’.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रश्नाला उत्तर देत म्हणतात, “हो खरंय, करोडो देशवासियांचं प्रेम तर आहेच आणि ती खूप मोठी ताकद आहे. मला आता या सरकारमध्ये मुख्य म्हणून २५ वर्षे झाली. हा खूप मोठा कार्यकाळ आहे आणि त्यानंतरही इतके आशीर्वाद मिळतात, त्याचा हा प्रभाव आहे.” पंतप्रधान मोदींनी करोडो देशवासियांचं प्रेम आणि त्यांच्या आशीर्वादामुळे हे सर्व आहे. असं म्हटलं.

मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनीही त्या हलक्याफुलक्या क्षणात सहभागी होत पंतप्रधानांना विनोदी स्वरात म्हटलं, “सर, बघताय ना, अशा व्यक्तिमत्त्वांशी मला रोज डील करावं लागतं. त्यामुळेच माझे केस पांढरे झालेत!”

अमोल मुझुमदार यांनी सांगितला किंग्स चार्ल्सच्या भेटीचा किस्सा

कोच अमोल मुझुमदार यांनी इंग्लंड दौऱ्यातील एक किस्सा सांगितला. त्यांनी सांगितलं की त्या वेळी संघाला किंग चार्ल्स यांच्यासोबत फोटो काढण्याची संधी मिळाली होती, पण प्रोटोकॉलनुसार एका फ्रेममध्ये केवळ २० लोकांनाच परवानगी होती. त्यामुळे संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफ एकत्र फोटो काढू शकले नाहीत.

मुझुमदार म्हणाले, “त्या वेळी आमच्या सपोर्ट स्टाफने म्हटलं होतं, काही हरकत नाही, किंग्स चार्ल्स यांच्याबरोबर फोटो राहिला तरी चालेल, कारण आम्ही तो क्षण जतन करून ठेवतोय, जेव्हा आम्ही वर्ल्डकप जिंकू आणि पंतप्रधान मोदींना भेटू!”