Harmanpreet Kaur Celebration With Father Viral Video: २ नोव्हेंबर २०२५ चा दिवस भारतीय महिला क्रिकेटला कलाटणी देणारा ठरला. यादिवशी टीम इंडियाच्या लेकींनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत महिला विश्वचषकाचं पहिलं जेतेपद पटकावलं. वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या टीम इंडियाने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली उत्कृष्ट कामगिरी केली. यानंतर संघातील खेळाडूंचे सेलिब्रेशनचे विविध व्हीडिओ समोर येत आहेत. यामध्ये हरमनप्रीत कौरचा तिच्या वडिलांनी तिला उचलून घेतल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
हरमनप्रीत कौर ही भारताला महिला विश्वचषक पटकावून देणारी पहिली कर्णधार ठरली. हरमनप्रीत कौरने संपूर्ण स्पर्धेत विशेषत: फायनलमध्ये संघाचं कमालीचं नेतृत्त्व केलं. संघाला विकेटची नितांत गरज असताना हरमनने मोठा डाव खेळला आणि पार्ट टाईम गोलंदाज शफाली वर्माला गोलंदाजी देण्याचा मोठा निर्णय घेतला. तिथेच सामना फिरला आणि शफालीने तिच्या दोन षटकांमध्ये दोन मोठ्या विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर टाकलं.
हरमनने या सामन्यात अखेरचा कमालीचा झेल टिपला आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ सर्वबाद होताच भारताच्या विश्वचषक विजयावर शिक्कामोर्तब झाला. भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर हरमन खूपच भावुक झालेली पाहायला मिळाली. तिचे वडील हरमंदर सिंग हे देखील मैदानावर उपस्थित होते. आता, विश्वचषक विजयानंतर, हरमनप्रीत आणि तिच्या वडिलांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
वर्ल्ड चॅम्पियन लेकीला वडिलांनी घेतलं उचलून! हरमनप्रीत व वडिलांचा VIDEO
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हरमनप्रीत कौर तिच्या वडिलांना मिठी मारते आणि तिचे बाबा तिला लहान मुलांप्रमाणे उचलून घेतात. हरमनसुद्धा अगदी लहान मुलगी होत वडिलांच्या कुशीत तशीच राहते. हरमनप्रीत कौरने विश्वचषक विजयाचं तिच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं.
हरमनप्रीत कौर महिला विश्वचषक जिंकणारी सर्वात वयस्कर कर्णधार ठरली. हरमनच्या नेतृत्त्वाखाली संघाने संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. भारताने उपांत्य फेरीत सात वेळा विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. या सामन्यात स्वत: कर्णधार हरमनने ८९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.
हरमनप्रीत कौर ही आतापर्यंत १२ आयसीसी स्पर्धांमध्ये खेळली आहे आणि प्रत्येक स्पर्धेत तिच्या पदरी अपयश आलं. तिने २००९, २०१३, २०१७ आणि २०२२ मध्ये एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होती. २००९, २०१०, २०१२, २०१४, २०१६, २०१८, २०२० आणि २०२३ मध्ये त्यांना टी-२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवता आली नाही. आता, तिच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने अखेर विश्वविजेते होण्याचा मान मिळवला आहे.
