INDW vs ENGW 3rd ODI Updates in Marathi: भारताची महिला कर्णधार हरमनप्रीत कौरने दणदणीत शतक झळकावलं आहे. इंग्लंडविरूद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात हरमनप्रीतने सातवं आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं आहे. हरमनने ८२ चेंडूत १४ चौकारांसह १०२ धावा करत शतक आपल्या नावे केलं. हरमनप्रीत कौरच्या शतकासह भारताने वनडे सामन्यात ३०० धावांचा पल्ला गाठला आहे.

भारताचा महिला क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. यादरम्यान दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० आणि ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली गेली. भारतीय महिला संघाने ४-१ च्या फरकाने टी-२० मालिका आपल्या नावे केली आहे. तर वनडे मालिकेतील अखेरचा वनडे सामना आज २२ जुलै रोजी खेळवला जात आहेत. या सामन्यात भारताची महिला कर्णधार हरमनप्रीत कौर हिने शतक झळकावलं आहे.

हरमनप्रीत कौर भारतासाठी वनडेमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारी दुसरी महिला फलंदाज आहे. या यादीत हरमनप्रीत कौरचं नाव दोन वेळा आहे, तर पहिल्या स्थानी स्मृती मानधना आहे. स्मृतीने ७० चेंडूत वनडेमध्ये भारताकडून सर्वात जलद शतक झळकावले आहे.

भारताची महिला कर्णधार असलेल्या हरमनप्रीत कौरने २०२५ मध्ये खेळताना एकही अर्धशतकी खेळी केली नव्हती. हरमनच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले जात होते. यानंतर आता हरमनने अर्धशतक नव्हे तर थेट शतकी खेळी करत टीकाकारांची बोलती बंद केली आहे. हरमनप्रीत कौरने या खेळीमध्ये वनडे क्रिकेटमधील आपल्या ४ हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये ४ हजार धावा पूर्ण करणारी ती तिसरी महिला फलंदाज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रतिका रावल २६ धावा करत बाद झाली. यानंतर स्मृती मानधना आणि हरलीन देओल यांनी प्रत्येकी ४५-४५ धावांची खेळी केली. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर ८४ चेंडूत १४ चौकारांसह १०२ धावा करत बाद झाली. याशिवाय जेमिमा रोड्रिग्जने अर्धशतकी खेळी केली. तर रिचा घोषने १८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३८ धावांची झटपट खेळी केली आणि यासह भारताने तिसऱ्या वनडे सामन्ात ५ बाद ३१८ धावांचा डोंगर उभारला आहे.