Harmanpreet Kaur Resignation Demand: यंदाच्या महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली पहिल्यांदाच विजेतेपद मिळवले. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रविवारी (काल) झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला. भारताने हे जेतेपद जिंकून २४ तास झाले नाहीत, त्याआधीच भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांनी हरमनप्रीत कौरने कर्णधारपदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी केली आहे.

भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हरमनप्रीत कौरने कर्णधारपद सोडावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असलेल्या ३६ वर्षीय हरमनप्रीतसाठी कर्णधारपद सोडणे फायदेशीर ठरेल. संघाचे दीर्घकालीन भविष्य लक्षात घेऊन हा निर्णय घ्यावा लागेल, असे त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, पुढील महिला एकदिवसीय विश्वचषक २०२९ मध्ये होणार आहे, तर टी-२० विश्वचषक पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणार आहे.

भारतीय क्रिकेट हितासाठी…

शांता रंगास्वामी म्हणाल्या की, “याला आता खूप उशीर झाला आहे. कारण हरमन फलंदाज आणि क्षेत्ररक्षक म्हणून उत्कृष्ट आहे. पण रणनीतीच्या बाबतीत ती कधीकधी चुका करते. मला वाटते की, जर तिच्यावर कर्णधारपदाचे ओझे नसेल तर ती संघासाठी अधिक चांगले योगदान देऊ शकते. पहा, अशा यशानंतर (विश्वचषक विजय) माझ्या या मागणीकडे योग्य दृष्टीने पाहिले जाणार नाही. परंतु भारतीय क्रिकेट आणि हरमनच्या स्वतःच्या हितासाठी मला वाटते की ती कर्णधारपदाच्या ओझ्याशिवाय फलंदाज म्हणून बरेच योगदान देऊ शकते.”

स्मृतीला कर्णधार करण्याची मागणी

त्या पुढे म्हणाल्या की, “हरमनकडे अजून तीन ते चार वर्षांचे क्रिकेट बाकी आहे. पण ती कर्णधार म्हणून कायम राहिल्यास तिला चांगली कामगिरी करता येणार नाही. स्मृती मंधानाला सर्व प्रकारच्या स्वरूपांमध्ये कर्णधार बनवले पाहिजे. तुम्हाला भविष्यातील विश्वचषकांसाठीदेखील नियोजन करण्याची आवश्यकता आहे.”

रोहित शर्माचा दाखला

यावेळी शांता रंगास्वामी यांनी रोहित शर्माचा दाखला दिला. या वर्षाच्या सुरुवातीला भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद मिळवून दिल्यानंतर संघाच्या फायद्यासाठी बीसीसीआयने त्याच्या जागी शुभमन गिलची एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली होती.