टी-२० विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दारुण पराभव जिव्हारी लागल्यानंतर काही धर्मांधांनी समाजमाध्यमांवरून भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला लक्ष्य केले. मात्र, भारताच्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी, तसेच सर्वसामान्य क्रिकेट रसिकांनीही भारताच्या या गुणी गोलंदाजाची एकदिलाने पाठराखण केली. जागतिक किर्तीचे क्रिकेट समालोचक आणि समीक्षक हर्षा भोगले यांनी एवढ्या खालच्या थराला जाऊन शमीवर टीका करणाऱ्यांना एक विनंती केली आहे.

टीकेचं कारण काय?
दुबई येथे रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून मानहानिकारक पराभव केला. या लढतीत शमीने ३.५ षटकांत ४३ धावा दिल्या. त्यामुळे काही जल्पकांनी त्याच्या धर्माकडे बोट दाखवून जाणूनबुजून अशी कामगिरी केल्याचा आरोप केला. काहींनी तर थेट पाकिस्तानकडून खेळण्याचे सल्ले देतानाच त्याला देशद्रोही असे संबोधले.

अनेकजण राहिले पाठिशी उभे…
मात्र शमीसाठी तत्परतेने पाठिंबाही व्यक्त होऊ लागला. विख्यात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, वीरेंदर सेहवाग, इरफान पठाण, हरभजन सिंग, यजुवेंद्र चहल, अमोल मुझुमदार, रुद्रप्रताप सिंह; तसेच राहुल गांधी, मोहम्मद ओवेसी असा राजकारण्यांनी शमीची पाठराखण केली आहे. खेळामध्ये धर्माशी निगडित बाबी आणून खेळाडूंना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास देऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. मात्र या साऱ्यामध्ये समालोचक हर्षा भोगलेंची प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

काय म्हणाले हर्षा?
हर्षा यांनी ट्विटरवरुन या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय. “जे लोक मोहम्मद शमीबद्दल पातळी सोडून वाईट शब्दांत टीका करत आहेत त्यांना माझी एकच विनंती आहे. तुम्ही क्रिकेट पाहू नका. तुम्ही क्रिकेट पाहिलं नाही तरी तुमची कमतरता जाणवणार नाही,” असा टोला हर्षा यांनी लगावला आहे. शमी आणि भारतासाठी घेतलेले ३५५ बळी असे हॅशटॅग त्यांनी वापरले आहेत. त्यांचं हे ट्विट व्हायरल झालं असून ११ हजारांहून अधिक जणांनी हे रिट्विट केलं आहे.

प्रत्येक गोष्टीत धर्माचं भांडवल
एकीकडे शमीला पाठिंबा दिला जात असला तरी जवळपास प्रत्येक बाबतीत धर्माचे भांडवल करणारी ही वाढती प्रवृत्ती अनेकांना अस्वस्थ आणि व्यथित करणारी ठरत आहे. या मुद्दय़ावर भारतीय संघ व्यवस्थापन किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून कोणतीही प्रतिक्रिया सोमवार रात्रीपर्यंत आलेली नव्हती. ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ला पाठिंबा देणारी मुद्रा पुढील सामन्यात शमीसाठी भारतीय संघाने करावी आणि त्याची माफी मागावी असाही सल्ला काही चाहत्यांनी दिला.