India vs England Test Series: आयपीएल २०२५ स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. दरम्यान रेवस्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ६ जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत.

गौतम गंभीर इंग्लंडला केव्हा जाणार याबाबत अनेक अंदाज वर्तवले गेले होते. मात्र, आता भारतीय संघाची पहिली बॅच आणि गौतम गंभीर हे ६ जूनला इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्याआधी भारतीय अ संघातील खेळाडू २५ मे रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. भारतीय अ संघात शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. मात्र, हे दोघेही पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसतील. हे दोघेही दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय अ संघासोबत जोडले जाणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, ज्या खेळाडूंचा भारतीय अ संघात समावेश करण्यात आला आहे, त्यापैकी काही खेळाडूंची मुख्य संघात निवड होऊ शकते. भारतीय अ संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी ऋषिकेश कानिटकर यांच्याकडे असणार आहे.

भारतीय अ संघात फिरकी गोलंदाज मानव सुतारचा देखील समावेश करण्यात आला आहे. या गोलंदाजाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळण्याची संधी मिळाली होती. आता इंग्लंड लायन्सविरुद्ध होणाऱ्या मालिकेतही त्याला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विराट, रोहितशिवाय भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार

यावेळचा इंग्लंड दौरा हा भारतीय संघासाठी मुळीच सोपा नसणार आहे. कारण यावेळी भारतीय संघ विराट कोहली आणि रोहित शर्माशिवाय इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. आधी रोहित शर्माने इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी शेअर करून आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर विराट कोहलीनेही इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करून निवृत्तीची घोषणा केली. या दोघांनी अचानक घेतलेली निवृत्ती हा भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे. यासह आर अश्विन देखील संघात नसणार आहे. त्यामुळे या दोघांची जागा भरून काढण्यासाठी कोणाला संधी द्यावी? असा प्रश्न बीसीसीआयसमोर असणार आहे. यासह भारतीय कसोटी संघाला नवा कर्णधार देखील मिळणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, शुबमन गिलकडे भारतीय कसोटी संघाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.