Hongkong Super Sixes 2025: सध्या हाँगकाँगमध्ये सुपर सिक्सेस २०२५ स्पर्धेचा थरार सुरू आहे. षटकार- चौकारांची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत अनेक मोठे रेकॉर्डस बनवले जातात. दरम्यान या स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा सुपर फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळवला. पण शनिवारी भारताला कुवेत, यूएई आणि नेपाळकडूनही पराभवाचा सामना करावा लागला आहे.
नेपाळचा भारतीय संघावर एकतर्फी विजय
नवख्या नेपाळ संघाने भारतीय संघावर एकतर्फी विजयाची नोंद केली. पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या नेपाळच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत नेपाळने अवघ्या ६ षटकात १३७ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय फलंदाजांना अवघ्या ४५ धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना नेपाळने ९२ धावांनी आपल्या नावावर केला.
कुवेतकडून भारतीय संघाचा पराभव
या सामन्यात कुवेतने प्रथम फलंदाजी करताना ६ षटकात १०६ धावा केल्या होत्या. कुवेतकडून फलंदाजी करताना यासिन पटेलने १४ चेंडूत ५८ चेंडूंची स्फोटक खेळी केली. तर बिलाल ताहीरने. २५ धावा केल्या. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १०७ धावा करायच्या होत्या. पण भारतीय संघाला ५.४ षटकात अवघ्या ७९ धावा करता आल्या. भारतीय संघाकडून अभिमन्यू मिथुनने २६ धावांची खेळी केली.
यूएईकडूनही झाला पराभव
नेपाळ आणि कुवेतसह भारतीय संघाला यूएई कडूनही पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने ३ गडी बाद १०७ धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना अभिमन्यू मिथुनने ५० धावांची खेळी केली. तर दिनेश कार्तिकने ४२ धावा चोपल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या यूएईकडून कर्णधार खालिद शाहने १४ चेंडूत ५० धावांची खेळी करून विजय मिळवून दिला.
