ICC World Cup 2023, Points Table: विश्वचषक २०२३च्या २२व्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा आठ विकेट्सनी पराभव करून एकच खळबळ निर्माण केली. अफगाणिस्तानने या विजयासह इतिहास रचला. या संघाने प्रथमच एकाच विश्वचषकात दोन सामने जिंकले आहेत. यापूर्वी त्यांनी याच विश्वचषकात इंग्लंडचा पराभव करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. सर्व विश्वचषकातील मिळून हा त्याचा तिसरा विजय ठरला. या विश्वचषकापूर्वी त्यांनी २०१५ मध्ये पहिला विजय मिळवला होता. पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यानंतर गुणतालिकेत मोठे फेरबदल झाले. तसेच, ही स्पर्धा आता सर्व संघांसाठी खुली झाली आहे. कोणताही संघ उपांत्य फेरी गाठू शकतो. भारत आणि न्यूझीलंड हे प्रमुख दावेदार वाटत आहेत, दुसरीकडे उर्वरित आठ संघांपैकी कोणतेही दोन संघ अंतिम चारमध्ये प्रवेश करू शकतात. जाणून घेऊया गुणतालिकेची सध्यस्थिती…
अफगाणिस्तान-पाकिस्तान सामन्यात काय घडलं?
नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सात गडी गमावून २८२ धावा केल्या. पाकिस्तानकडून बाबरने ७४ धावा आणि अब्दुल्ला शफीकने ५८ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने ४९ षटकांत दोन गडी गमावून २८६ धावा केल्या आणि सामना आठ गडी राखून जिंकला. अफगाणिस्तानकडून इब्राहिम झद्रानने ८७ धावा, रहमत शाहने नाबाद ७७ आणि रहमानउल्ला गुरबाजने ६५ धावा केल्या. कर्णधार शाहिदीने नाबाद ४८ धावा केल्या.
भारत अव्वल, न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आहे
खरं तर, रविवारी स्पर्धेच्या २१व्या सामन्यापर्यंत, न्यूझीलंड आणि भारत हे दोन्ही संघ विश्वचषक स्पर्धेत अपराजित होते आणि त्यांनी चारपैकी चार सामने जिंकले होते. मात्र, २१व्या सामन्यानंतर किवी संघाच्या वाटेला पराभवाचा आकडा जोडला गेला. भारतीय संघ अजूनही अजिंक्य आहे आणि त्याने पाचपैकी पाचही सामने जिंकले आहेत. सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता, मात्र भारतीय संघाने त्यांचा पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.
सध्याच्या गुणतालिकेत भारताने पाच सामन्यांत पाच विजय मिळवले आहेत. त्यांचे एकूण १० गुण आहेत आणि त्यांची निव्वळ धावगती +१.३५३ आहे. न्यूझीलंडचा संघ पाच सामन्यांत चार विजय आणि आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्याचा निव्वळ धावगती +१.४८१ आहे. २०१९ विश्वचषक स्पर्धेत भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने नऊपैकी सात सामने जिंकले. एकात पराभवाला सामोरे जावे लागले तर एक सामना अनिर्णित राहिला.
भारत-न्यूझीलंडचा आतापर्यंतचा प्रवास
रोहित शर्माच्या टीम इंडियाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून, दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा आठ गडी राखून आणि तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला. पुण्यातील चौथ्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला आणि आता न्यूझीलंडचा पराभव केला आहे. त्याचवेळी किवी संघाने पहिल्या सामन्यात इंग्लंडचा नऊ गडी राखून, दुसऱ्या सामन्यात नेदरलँडचा ९९ धावांनी तर तिसऱ्या सामन्यात बांगलादेशचा ८ विकेट्स राखून पराभव केला. त्यानंतर अफगाणिस्तानचा पराभव करून करत आठ गुण मिळवले. मात्र, पाचव्या सामन्यात त्यांना भारताकडून पराभव पत्करावा लागला.
पराभवानंतरही पाकिस्तान पाचव्या स्थानावर, अफगाणिस्तानची मोठी झेप
शनिवारी इंग्लंडवर मोठ्या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेची स्थिती मजबूत झाली आहे. चार सामन्यांत तीन विजय आणि एक पराभवासह त्याचे सहा गुण झाले असून संघ तिसऱ्या स्थानावर आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा नेट रन रेट, जो +२.२१२ असा सर्वाधिक आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघाने यापूर्वी श्रीलंकेचा पराभव करून नवव्या क्रमांकावरून सहाव्या स्थानावर झेप घेतली होती. यानंतर पाकिस्तानचा पराभव करून संघ सहाव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचला. त्याचा नेट रन रेट पाकिस्तानपेक्षा चांगला झाला आहे. ऑस्ट्रेलियाने चार सामने खेळले असून दोघांचे दोन विजय, दोन पराभवांसह चार गुण आहेत. ऑस्ट्रेलियाची निव्वळ धावगती -०.१९३ त्याचबरोबर अफगाणिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा नेट रन रेट -०.४०० झाली आहे. त्याने पाचपैकी दोन सामने जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत.

पाकिस्तानचे पुढील काही सामने कठीण असतील
मात्र, पाकिस्तानचा संघ अजूनही पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तानवर विजय मिळवण्यापूर्वी अफगाणिस्तानचा संघ शेवटच्या म्हणजे दहाव्या स्थानावर होता. विजयानंतर संघाने मोठी झेप घेत सहाव्या स्थानावर पोहोचले. त्यांच्याकडे पाच सामन्यांत दोन विजय आणि तीन पराभवांसह चार गुण आहेत. मात्र, नेट रन रेटमध्ये हा संघ पाकिस्तानच्या मागे आहे. अफगाणिस्तानचा निव्वळ धावगती -०.९६९ आहे. अफगाणिस्तान संघाने आगामी सामन्यांमध्ये अशीच कामगिरी करत राहिल्यास हा संघ इतिहास रचून उपांत्य फेरीत धडक मारू शकतो. त्याचबरोबर पाकिस्तानचे न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या मोठ्या संघांविरुद्ध तीन मोठे सामने आहेत. त्यांचा मार्ग अवघड वाटत आहे.