Team India Qualification Scenario To Enter In Semi Final: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये अटीतटीचा सामना रंगला. शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाने बाजी मारून भारतावर ३ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने ३३० धावा केल्या होत्या. ३३१ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी शेवटच्या षटकात षटकार मारून विजयाची नोंद केली. सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणं महत्वाचं होतं. पण हा सामना गमावल्यामुळे भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. दरम्यान आता सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी भारतीय संघासाठी कसं आहे समीकरण? समजून घ्या.
भारतीय संघ गुणतालिकेत कितव्या स्थानी?
आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. यापैकी २ सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवता आला आहे. तर २ सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ४ गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी कायम आहे. भारतीय संघाचा नेट रनरेट हा +०.६७२ इतका आहे.
भारतीय संघ इथून पुढे आणखी ३ सामने खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारताचे पुढील सामने इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेशविरूद्ध होणार आहे. भारतीय संघाला हे पुढील तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. असं झाल्यास, भारतीय संघ १० गुणांपर्यंत पोहोचू शकतो. यासह भारतीय संघाच्या नेट रनरेटमध्येही आणखी भर पडू शकते. पण जर भारतीय संघाने ३ पैकी २ सामने जिंकले आणि १ सामना गमावला, तर भारतीय संघाच्या अडचणीत वाढ होऊ शकते. भारतासाठी सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा असेल, पण भारतीय संघाला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल.
गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने ४ सामने खेळले आहेत. या संघाने ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत. तर १ सामना अनिर्णित राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत ७ गुणांची कमाई केली आहे. तर ३ पैकी ३ सामने जिंकून इंग्लंडचा संघ दुसऱ्या स्थानी आहे.