Ajinkya Rahane, India vs England: अँडरसन– तेंडुलकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. दोन्ही संघांनी २ पैकी १–१ सामने जिंकले आहेत. तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. दरम्यान हा सामना सुरू असताना भारताचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अजिंक्य रहाणे सध्या इंग्लंडमध्ये आहे. त्याने विम्बल्डन स्पर्धा पाहण्यासाठी हजेरी लावली होती. तिसऱ्या दिवसातील पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर अजिंक्य रहाणे नासीर हुसेन आणि मायकल आथर्टनसोबत गप्पा मारताना दिसून आला. राहणेला इंग्लंडमध्ये खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे. या चर्चेदरम्यान आथर्टन यांनी रहाणेच्या कसोटी कारकिर्दिचा उल्लेख केला.
या चर्चेदरम्यान आथर्टन यांनी अजिंक्य रहाणेला कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याबाबत प्रश्न विचारला. ते म्हणाले, “ रहाणे तू ३७ वर्षांचा झाला आहेस. तू कसोटी कसोटी क्रिकेट खेळण्याचा विचार सोडून दिला आहेस का?” या प्रश्नाचं उत्तर देताना रहाणे म्हणाला, “ मुळीच नाही, मला इथे येऊन खूप आनंद झाला आहे. मला अजूनही कसोटी क्रिकेट खेळायचं आहे. सध्या मी माझा खेळ एन्जॉय करतोय. फिट राहण्यासाठी मी माझा ट्रेनर आणि ट्रेनिंगचे कपडे सोबत घेऊन आलो आहे. देशांतर्गत स्पर्धांना लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे मला तयारी करायची आहे.”
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून देणारा अजिंक्य रहाणे गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे. २०२३ मध्ये वेस्टइंडिज विरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळताना दिसून आला होता. त्यानंतर तो संघाबाहेर झाला. तेव्हापासून ते आतापर्यंत तो भारतीय संघात पुनरागमन करू शकलेला नाही. सध्या तो देशांतर्गत क्रिकेट खेळतोय. मुंबईकडून खेळताना त्याने दमदार कामगिरी केली आहे. रहाणेने आपल्या कसोटी कारकिर्दीत ८५ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ३७.४६ च्या सरासरीने ५०७७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २६ अर्धशतकं आणि १२ शतकं झळकावली आहेत. आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून तो भारतीय संघात कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.