सुप्रिया दाबके, लोकसत्ता

मुंबई : प्रत्येक खेळाडू ऑलिम्पिकमध्ये खेळण्याच्या दृष्टीने तयारी करतो. मला फक्त ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरायचे नाही तर पदक जिंकायचे आहे. मात्र त्याआधी जागतिक टेबल टेनिस स्पर्धा आणि २०२२च्या बर्मिगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागासाठी मी जिद्दीने प्रयत्न करणार आहे. कारण ऑलिम्पिकला पात्र ठरायचे असेल तर या विविध स्पर्धामधून मला चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल, असे मुंबईची टेबल टेनिसपटू दिया चितळेने सांगितले.

जम्मू येथे राष्ट्रीय स्पर्धेत दुहेरी पदके जिंकणारी महाराष्ट्राची पहिली टेबल टेनिसपटू ठरल्यानंतर दियाने नुकतेच गुवाहाटी येथील खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले. या यशाबाबत दिया म्हणाली की, ‘‘खेलो इंडियामध्ये मी गेल्या वर्षी रौप्यपदक मिळवले होते, त्यामुळे यंदा सुवर्णपदक पटकवण्याची जिद्द होती. यंदा सुवर्णपदकाची इच्छा पूर्ण झाली, याचा सर्वाधिक आनंद आहे. खेळात सातत्य महत्त्वाचे असून जे यश आतापर्यंत मिळवले आहे, ते यापुढेही मिळवणार आहे.’’

जुहूच्या जमनाबाई नरसी स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या दियाच्या घरात टेबल टेनिसची पार्श्वभूमी नाही. खार जिमखाना येथे दिया प्रथम टेबल टेनिस खेळली आणि नंतर तिला या खेळाची आवड निर्माण झाली. मग फक्त भारतातच नव्हे, तर जर्मनीमध्येही दियाने काही महिने पीटर अ‍ॅँगेल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. याविषयी ती म्हणाली, ‘‘जर्मनीत मला पीटर अ‍ॅँगेल यांच्या मार्गदर्शनाखाली जर्मन लीग तसेच अनेक सामन्यांमध्ये अनुभवी टेबल टेनिसपटूंसोबत सरावाची आणि सामने खेळण्याची संधी मिळाली.

अल्टिमेट लीगमुळे युवा खेळाडूंना फायदा!

अल्टिमेट टेबल टेनिस लीगमुळे भारतातील युवा मंडळींना अनुभव मिळत असल्याचे दिया सांगते. ‘‘या लीगमुळे भारतातील टेबल टेनिसचे चित्र पूर्ण बदलले आहे. या लीगचा फायदा माझ्यासारख्या भारतातील युवा मंडळींना सर्वाधिक झाला आहे. कारण परदेशातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत सराव करण्याची आणि त्यांच्यासोबत सामने खेळण्याची संधी या लीगमध्ये मिळाली. याआधी तीन वर्षे मी लीगमध्ये खेळले आहे. आता राष्ट्रीय स्पर्धामधील यशामुळे यंदादेखील लीगमध्ये खेळायला मिळेल अशी अपेक्षा आहे,’’ असे दियाने सांगितले.