ICC Announces Revised Schedule for Womens Cricket World Cup: आशिया चषक २०२५ नंतर भारतात महिलांचा एकदिवसीय विश्वचषक २०२५ खेळवला जाणार आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक देखील आयसीसीने पूर्वीच जाहीर केलं आहे. पाकिस्तानचा संघ वर्ल्डकप सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. पण आता आयसीसीने या वेळापत्रकात बदल केला आहे. वेळापत्रकातील सामन्यांच्या ठिकाणांमध्ये बदल केला आहे.
एकदिवसीय विश्वचषकासाठी भारताचा महिला संघ देखील जाहीर करण्यात आला आहे. हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी असेल. तर स्मृती मानधना या संघाची उपकर्णधार असणार आहे. महिलांच्या विश्वचषकाचे सामने गुवाहाटी, इंदौर, विशाखापट्टणम आणि बंगळुरू येथे सामने खेळवले जाणार होते. पण आता आयसीसीने शेअर केलेल्या सुधारित वेळापत्रकात बंगळुरूऐवजी मुंबईत सामने खेळवले जाणार आहेत.
भारताचे दोन आणि श्रीलंका विरूद्ध बांगलादेश यांच्यातील सामना नवी मुंबई येथील डी वाय पाटील स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. महिला विश्वचषक २०२५ चे एकूण ४ सामने बेंगळुरूच्या चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जाणार होते. यामध्ये तीन लीग सामने आणि एक उपांत्य फेरीच्या सामन्याचा समावेश होता.
३० सप्टेंबर रोजी होणारा भारत विरुद्ध श्रीलंका सामना, ३ ऑक्टोबर रोजी होणारा इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना, २६ सप्टेंबर रोजी होणारा भारत विरुद्ध बांगलादेश सामना आणि ३० ऑक्टोबर रोजी होणारा उपांत्य फेरीचा सामना आता नवी मुंबईत होणार आहे. अंतिम सामना नवी मुंबई किंवा कोलंबोमध्ये खेळवला जाऊ शकतो.
बंगळुरूमध्ये का होणार नाहीत वर्ल्डकपचे सामने?
आरसीबी संघाने आयपीएल २०२५ चे विजेतेपद पटकावले. यानंतर, आरसीबीचे खेळाडू बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयाचा आनंद चाहत्यांबरोबर साजरा करण्यासाठी जमले. त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती आणि त्यानंतर चेंगराचेंगरीत अनेक चाहत्यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर कर्नाटक सरकारने एक आयोग समिती स्थापन केली, ज्याने बंगळुरूचे मैदान मोठ्या स्पर्धांसाठी असुरक्षित घोषित केले आहे. आता यानंतर, आयसीसीने बंगळुरूच्या मैदानावर सामने न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
जय शाहांनी वर्ल्डकपच्या वेळापत्रकाबाबत केलं वक्तव्य
आयसीसी अध्यक्ष जय शाह म्हणाले की, अलिकडच्या काळात नवी मुंबई महिला क्रिकेटचे घर म्हणून उदयास आलं आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान आणि महिला प्रीमियर लीग दरम्यान मिळालेला पाठिंबा खेळाडूंना प्रोत्साहन देतो. मला खात्री आहे की हा उत्साह १२ वर्षांनंतर भारतात परतणाऱ्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाच्या मोठ्या सामन्यांसाठी उपयुक्त ठरेल.