भारत विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामना म्हणला की त्याचं टेन्शन हे जसं क्रिकेटपटूंवर असतं तितकचं ते दोन्ही संघांच्या पाठीराख्यांनाही असतं. त्यामुळे प्रत्येक सामन्याला आपल्या संघाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने मैदानात हजेरी लावत असतात.गेल्या काही दिवसांमधला पाकिस्तानी संघाचा खेळ पाहता अंतिम सामन्याआधी पाकिस्तानी संघाला त्यांच्या चाहत्यांचा भरभरुन पाठींबा मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडच्या संघाला पराभूत केलं त्यावेळी स्टेडियममध्ये १२ हजार ५०० पाकिस्तानी चाहते उपस्थित होते. यावेळी लंडन शहर हे लाहोरप्रमाणे वाटत होतं अशी तुलनाही काही स्थानिक वृत्तपत्रांनी केली होती.
कर्णधार सरफराज अहमद, जावेद अली, जुनैद खान यांच्यासारखा खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे अंतिम सामन्यात पाकिस्तानी चाहते आपल्या संघाला पाठींबा दर्शवण्यासाठी अजून मोठ्या प्रमाणात गर्दी करु शकतात असा अंदाज लावला जातोय. पाकिस्तानी संघासाठी हा पाठींबा केवळ स्टेडीयममध्ये नाही तर स्टेडीयमबाहेरही पहायला मिळतोय. सामना सुरु व्हायच्या आधी आणि संपल्यानंतर ढोल आणि इतर वाद्यांच्या तालावर नाचत गात संपूर्ण परिसर पाकिस्तानी चाहते दणाणून सोडतायत.
पाकिस्तानी चाहत्यांकडून मिळत असलेल्या या पाठींब्याबद्दल पाक क्रिकेटर हसन अलीनेही त्यांचे आभार मानले आहेत. ज्या प्रमाणात पाकिस्तानी चाहत्यांचं समर्थन आपल्या संघाला मिळतंय ते पाहून आम्ही घरच्या मैदानावरच खेळत असल्याचं वाटतं असं अली म्हणाला.
भारतीय पाठीराखेही आपल्या संघाला सपोर्ट करण्याच्या बाबतीत मागे नाहीयेत. ओव्हल असो अथवा बर्मिंगहॅम प्रत्येक सामन्यात भारतीय चाहते टीम इंडियाचा उत्साह वाढवतायत. त्यामुळे अंतिम सामन्यात टीम इंडियाची ‘भारत आर्मी’ पुन्हा सेलिब्रेशन करणार की पाकिस्तानी चाहत्यांचा पाठींबा त्यांचा संघाला तारणार हे पहावं लागेल.