विश्वचषक स्पर्धेत अजिंक्य असलेल्या भारताला अखेर रविवारी पराभवाचे तोंड पाहावे लागले. यजमान इंग्लंडने भारताला ३१ धावांनी पराभूत केले. लियाम प्लंकेट आणि ख्रिस वोक्स यांनी टिच्चून मारा करत विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला विजयपथावर आणलं. ३३८ धावांचा पाठलाग करताना भारताचा संघ ३०६ धावांपर्यंतच मजल मारु शकला. या विजयासह इंग्लंडचे आव्हान अद्यापही जिवंत आहे. पण त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झाली.

पाकचा आता बांगलादेशशी सामना होणार आहे. बांगलादेश, पाकिस्तान आणि इंग्लंड या ३ संघांमध्ये सध्या चौथ्या स्थानासाठी शर्यत दिसून येत आहे. इंग्लंडच्या भारतावरील विजयाचा फटका पाकला बसला आहे. कारण इंग्लंडचा साखळी फेरीत आता न्यूझीलंडशी सामना होणं बाकी आहे. तर पाकचा बांगलादेशशी सामना होणार आहे. पाकला जर उपांत्य फेरी गाठायची असेल, पाकला बांगलादेशला पाणी पाजावे लागेल तसेच इतर संघाच्या सामन्यावरही लक्ष ठेवावे लागेल. पण जर रविवारच्या सामन्यात भारताकडून इंग्लंड पराभूत झाला असता, तर पाकचे उपांत्य फेरीत पोहोचणे सुकर झाले असते. पण भारतीय संघ पराभूत झाला. त्यानंतर पाकच्या चाहत्यांनी आणि इतर माजी खेळाडूंनी भारतावर अखिलाडूवृत्तीचा आरोप केला.

भारतीय संघाला पाकिस्तानचा काटा काढायचा होता, म्हणूनच भारत इंग्लंडविरुद्ध मुद्दाम पराभूत झाला असा आरोप माजी पाक क्रिकेटपटू वकार युनिस याने केला आहे. “तुम्ही कशा प्रकारचा संघ आहात ते महत्वाचे नाही. तुम्ही काय करता त्यावरून तुम्ही कसा संघ आहात ते ठरते. पाकिस्तानच्या संघाला विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान मिळेल की नाही ते मला माहित नाही. मी त्याबाबत फारसा विचारदेखील करत नाही. पण काही चॅम्पियन संघाच्या खिलाडूवृत्तीची परीक्षा झाली आणि त्यात ते पूर्णपणे नापास झाले.”, असे ट्विट वकारने केले आहे. महत्वाचे म्हणजे त्याने या ट्विटमध्ये कोणाचेही नाव घेतले नसले, तरीही त्याने भारत विरुद्ध इंग्लंड हा हॅशटॅग त्या ट्विटमध्ये वापरला आहे. त्यामुळे हा आरोप त्याने भारतावरच केला असल्याचे स्पष्टपणे समजते.

दरम्यान, ३३८ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. लोकेश राहुल एकही धाव न काढता माघारी परतला. कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्माने शतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. रोहित-विराटची जोडी भारताला विजय मिळवून देईल असं वाटत असतानाच लियाम प्लंकेटने विराटला माघारी धाडलं. त्याने ६६ धावांची खेळी केली. यानंतर रोहित शर्माने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रोहितने आपलं शतकही पूर्ण केलं. मात्र इतर कोणत्याही खेळाडूने जबाबदारीने खेळ केला नाही. त्यामुळे भारताला स्पर्धेतील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडकडून प्लंकेटने ३ तर वोक्सने २ बळी घेतले.

इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो याने आक्रमक शतक केले. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.