ICC Test Rankings After IND vs ENG 1st Test: भारत वि. इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात ७ शतकं पाहायला मिळाली. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी ७ शतकं केली आहेत. यामध्ये भारताच्या ऋषभ पंतने दोन्ही डावांमध्ये शतक झळकावत वादळी कामगिरी केली. पण या सामन्यात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं. इंग्लंडने पहिल्याच कसोटीत भारताला ५ विकेट्सने पराभूत केलं. दरम्यान आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे.
भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात केलेल्या चांगल्या कामगिरीचा फायदा झाला आहे. ऋषभ पंत आणि बेन डकेट यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवले आहे. पंतने एका स्थानाने झेप घेतली आहे आणि डकेटने ५ स्थानांची मोठी झेप घेतली आहे.
भारताचा नवा कसोटी कर्णधार शुबमन गिलनेही पहिल्या डावात शतक झळकावले. त्याने ५ स्थानांची झेप घेतली असून तो २०व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर ऑली पोपने ३ स्थानांची झेप घेत १९वे स्थान गाठले आहे.
लीड्स कसोटीच्या दोन्ही डावात ऋषभ पंतने शतक झळकावले. यानंतर आता तो ८०१ रेटिंग गुणांसह सातव्या स्थानावर पोहोचला. बेन डकेटने पहिल्या डावात ६० धावा केल्या. दुसऱ्या डावात त्याने शतकी कामगिरी करत इतिहास लिहिला आहे. तो १३ व्या स्थानावरून आठव्या स्थानावर पोहोचला. त्याचे रेटिंग गुण ७८७ झाले आहेत.
इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट हा जगातील नंबर वन कसोटी फलंदाज आहे, तर त्याचा सहकारी हॅरी ब्रुक दुसऱ्या क्रमांकावर आहे. केएल राहुललाही शतक झळकावण्याचा फायदा झाला आहे. त्याने १० स्थानांनी झेप घेतली असून तो ३८ व्या क्रमांकावर पोहोचला.

श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी अनिर्णित राहिली. मुशफिकुर रहीमने गॉलमध्ये १६३ धावा केल्या. ११ स्थानांची झेप घेत तो २८ व्या क्रमांकावर पोहोचला. नझमुल हसन शांतोने दोन्ही डावात शतकं झळकावली. त्याने २१ स्थानांनी झेप घेत २९ वा क्रमांक गाठला आहे.
कसोटी गोलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत कोणताही मोठा बदल झालेला नाही. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्या आणि आपले अव्वल स्थान कायम ठेवले. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या अष्टपैलू कामगिरीनंतर कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तीन स्थानांनी झेप घेत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.