वृत्तसंस्था, दुबई

‘हस्तांदोलन’ वादानंतर सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेतून हटविण्याची पाकिस्तान क्रिकेट मंडळाची (पीसीबी) मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) फेटाळून लावली आहे. पायक्रॉफ्ट यांना हटविले नाही तर आम्ही स्पर्धेवर बहिष्कार टाकू, असा इशाराही ‘पीसीबी’ने दिला होता. परंतु आज, बुधवारी होणारा संयुक्त अरब अमिरातीविरुद्धचा सामना न खेळल्यास पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. तसेच स्पर्धेतून थेट माघार घेतल्यास ‘पीसीबी’ला आशियाई क्रिकेट परिषदेकडून (एसीसी) मिळणाऱ्या महसुलावरही पाणी सोडावे लागू शकेल. हा सर्व धोका लक्षात घेता, पाकिस्तानचा संघ अमिरातीविरुद्ध खेळणे अपेक्षित आहे.

पाकिस्तानविरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात विजयानंतर प्रतिस्पर्धी खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच भारतीय संघाने मैदान सोडले होते. त्यापूर्वी नाणेफेकीच्या वेळीही भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा यांनी एकमेकांशी हात मिळवले नाहीत. प्रतिस्पर्धी कर्णधारांना हस्तांदोलन न करण्याच्या सूचना पायक्रॉफ्ट यांनी दिल्या होत्या, असा दावा ‘पीसीबी’कडून करण्यात आला. तसेच पायक्रॉफ्ट यांच्याविरोधात ‘आयसीसी’कडे तक्रार करताना ‘पीसीबी’ने त्यांना सामनाधिकारी म्हणून आशिया चषकातून हटविण्याची मागणी केली होती. ‘आयसीसी’वर दडपण आणण्यासाठी ‘पीसीबी’ने पायक्रॉफ्ट यांना दूर न केल्यास स्पर्धेतून माघार घेण्याचा इशाराही दिला होता. परंतु याचा फारसा परिणाम झाला नाही.

‘‘सोमवारी रात्री ‘आयसीसी’ने ‘पीसीबी’ला आपले उत्तर पाठवले. त्यात पायक्रॉफ्ट यांना हटविण्याची ‘पीसीबी’ची मागणी फेटाळण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे,’’ असे ‘आयसीसी’च्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

विशेष म्हणजे, पाकिस्तान आणि अमिराती यांच्यात आज साखळी सामना नियोजित असून त्यात सामनाधिकाऱ्याची भूमिका पायक्रॉफ्टच बजावणार आहेत. त्यामुळे ‘पीसीबी’ संकटात सापडले आहे. त्यांनी बहिष्काराचा इशारा तर दिला. परंतु प्रत्यक्षात तसे पाऊल उचलल्यास त्यांना आर्थिक परिणाम भोगावे लागू शकतील. तसेच ‘एसीसी’ आणि ‘आयसीसी’मधील त्यांचे स्थानही कमकुवत होईल.

महसूल गमावण्याचा धोका

● पायक्रॉफ्ट यांना आशिया चषकातून न हटविल्यास आपण स्पर्धेतून माघार घेऊ असा इशारा पाकिस्तान संघाने दिला होता. मात्र, प्रत्यक्षात तसे केल्यास त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागेल.

● आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) वार्षिक महसुलातील ७५ टक्के हिस्सा (प्रत्येकी १५ टक्के) भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या कसोटी खेळणाऱ्या संघांना मिळतो. उर्वरित २५ टक्के हिस्सा सहयोगी सदस्यांना दिला जातो.

● केवळ आशिया चषकातून, ‘पीसीबी’ला १.२० ते १.६० कोटी अमेरिकन डॉलर (अंदाजे १०५ कोटी भारतीय रुपये) इतकी रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

● त्यामुळे आशिया चषकातून माघार घेण्याचे पाऊल उचलल्यास ‘पीसीबी’ला या रकमेला मुकावे लागू शकेल. तसेच ‘एसीसी’च्या वार्षिक महसुलातून मिळणाऱ्या हिश्शावरही पाणी सोडावे लागू शकेल.

● इतके मोठे आर्थिक नुकसान सहन करण्याची ताकद ‘पीसीबी’मध्ये नसल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे ते आशिया चषकात पुढे खेळत राहणे अपेक्षित आहे.