टी२० विश्वचषक २०२२ मधील सुपर-१२ फेरीतील शेवटचे ३ सामने रविवारी (दि. ५ नोव्हेंबर) खेळले गेले. यातील तिसरा सामना भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात मेलबर्न येथे संपन्न झाला. भारतीय संघ टी२०विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत अगोदरच पोहचला असून झिम्बाब्वेविरुद्धचा सामना केवळ औपचारिकता होती. पण गटातील अव्वलस्थान कायम राखण्यासाठी टीम इंडियाला हा विजय आवश्यक होता आणि त्यांनी तो मिळवला. टी२० विश्वचषकातील अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेवर ७१ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत थाटात प्रवेश केला. सूर्यकुमार यादवची झंझावती खेळी आणि लोकेश राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने तगडे लक्ष्य उभे केले. त्यानंतर गोलंदाजांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडली. भारताने या विजयासह ग्रुप २ मध्ये ८ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले. उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर इंग्लंडचे आव्हान असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर झिम्बाब्वेचा ओपनर वेस्ली माधेव्हेरेला बाद केले. विराटने अफलातून झेल घेतला. त्यानंतर अर्शदीप सिंगने वेगवान चेंडू टाकून रेगीस चकाब्वाचा त्रिफळा उडवला. २ बाद २ धावा असताना क्रेग एरविन व सीन विलियम्स यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु मोहम्मद शमीने ही जोडी फोडत भारतला यश मिळवून दिले. विलियम्स (११) भुवीच्या हाती झेल देऊन माघारी परतला. पुढच्याच षटकात हार्दिक पांड्याने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल घेत एरविनची (१३) विकेट घेतली. शमीने आणखी एक धक्का देताना झिम्बाब्वेची अवस्था ५ बाद ३६ अशी केली होती.३० चेंडूत ८३ धावा असे आव्हान असताना सिकंदर रझाने संघाची सर्व जबाबदारी त्याच्या खांद्यावर घेतली. अश्विनने झिम्बाब्वेला सातवा धक्का देताना वेलिंग्टन मसाकाड्झाला ( १) बाद केले. तीन चेंडूंच्या अंतराने रिचर्ड एगाराव्हा ( १) याचा अश्विनने त्रिफळा उडवला. अश्विनने ४ षटकात २२ धावा देत ३ गडी बाद उल्लेखनीय कामगिरी केली. सिकंदरने २४ चेंडूंत ३४ धावा करून माघारी परतला. हार्दिकने त्याला बाद केला. अक्षर पटेलने शेवटची विकेट घेतली आणि झिम्बाब्वेचा संघ ११५ धावांत माघारी परतला. भारताने ७१ धावांनी विजय मिळवला. सुर्यकुमार यादवला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

भारताने झिम्बाब्वेसमोर १८७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत ५ गडी गमावून १८६ धावा केल्या.आजच्या सामन्यात भारतीय संघात दिनेश कार्तिक ऐवजी ॠषभ पंतला संधी देण्यात आली होती. सलामीला आलेला कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. तो केवळ १५ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने केएल राहुलसोबत ६० धावांची भागीदारी करत मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला.

केएल राहुलने या सामन्यात अर्धशतक झळकावले. हे त्याचे टी२० विश्वचषकातील सलग दुसरे अर्धशतक होते. त्याने यावेळी ५१ धावांची खेळी केली. यामध्ये ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्याचबरोबर सूर्यकुमारने २५ चेंडूत ६१ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने सामन्याच्या शेवटी काही अविश्वसनीय फटके मारले. सूर्यकुमारने आपल्या खेळीत सहा चौकार आणि चार षटकार मारले. या दोघांव्यतिरिक्त विराट कोहली (२६) आणि हार्दिक पंड्या (१८) यांनी दोन आकडी धावसंख्या पार करत संघाच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. दिनेश कार्तिकच्या जागी संधी मिळालेल्या ॠषभ पंत याला या सामन्यात फक्त ३ धावा करता आल्या.

झिम्बाब्वेकडून गोलंदाजी करताना चार गोलंदाजांना विकेट्स घेण्यात यश आले. शॉन विलियम्स याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने २ षटकात ९ धावा देत २ गडी बाद करण्याची कामगिरी केली. त्याच्याव्यतिरिक्त सिकंदर रझा, ब्लेसिंग्स मुझरबानी आणि रिचर्ड नगारवा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. उपांत्य फेरीतील टीम इंडियाचा सामना ऐतिहासिक अॅडलेड ओव्हल मैदानावर १० तारखेला होणार आहे. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर भारत थेट अंतिम फेरीत पोहचेल.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs zim india tops group two after win over zimbabwe will face england in the semi finals avw
First published on: 06-11-2022 at 17:03 IST