T20 World Cup 2022 Pakistan vs New Zealand Time, Venue, Team Squad: ऑस्ट्रेलियात सुरु असलेला टी२० विश्वचषक २०२२ आता अंतिम टप्प्यात आला असून उपांत्य फेरीतील सामन्यांना आजपासून सुरुवात होत आहे. टी२० क्रिकेट विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य लढतीत बुधवारी म्हणजेच आज न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे संघ एकमेकांना भिडणार आहेत. स्पर्धेस सुरुवात झाल्यापासून न्यूझीलंड संघ आपण उपांत्य फेरीतील संघांचे प्रबळ दावेदार असल्याचे दाखवत होता. त्याचवेळी न्यूझीलंडची भक्कम वाटचाल रोखण्याचे आज पाकिस्तानचे लक्ष्य असणार आहे.

न्यूझीलंडने साखळी फेरीतील ५ पैकी ३ सामने जिंकत त्यांच्या ग्रुपमध्ये अव्वल स्थान कायम राखले आणि उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ होण्याचा मान त्यांनी मिळवला. दुसरीकडे पाकिस्तानला नशिबाची साथ लाभली. नेदरलॅंड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्याने पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा जिंवत राहिल्या. तसेच त्यांनी शेवटच्या साखळी सामन्यात बांगलादेशचा पराभव करत उपांत्य फेरीचे तिकिट मिळवले.

टी२० विश्वचषकात बाबर आझमचा फॉर्म हा फारसा काही चांगला नाही. कर्णधार बाबर आझम आणि अनुभवी यष्टीरषक फलंदाज मोहमद रिझवान यांना अपेक्षित खेळ दाखवता आला नाही. विश्वचषकात खेळलेल्या सामन्यात आत्तापर्यंत बाबर आझमने ३९ धावा काढल्या आहेत. तर, रिझवानने पाच सामन्यात १०३ धावा केल्या आहेत. त्यामुळे आता पाकिस्तान संघाची अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी फक्त एका खेळाडूवरच भिस्त आहे. हाच खेळाडू पाकिस्तानला विजय मिळवून देऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

केन विलियम्सनच्या न्यूझीलंडलाही कमी लेखण्याची चूक कोणीच करणार नाही. त्यांच्या ग्रुपमध्ये श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे माजी विश्वविजेते होते; पण तरीही त्यांनी गटात अव्वल क्रमांक मिळवला. सिडनीतील वातावरण न्यूझीलंडसाठी जास्त पोषक असेल. पाकच्या कमकुवत फलंदाजीस हादरवण्याची ट्रेंट बोल्ट आणि टिम साउदीकडे नक्कीच क्षमता आहे.

आयसीसी स्पर्धांमधील दोन्ही संघांचा इतिहास

सिडनीत न्यूझीलंडची कामगिरी उंचावलेली. याच मैदानावर ग्लेन फिलिप्सच्या श्रीलंकेविरुद्ध ६४ चेंडूंत १०४; तसेच डेव्हॉन कॉन्वेच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५८ चेंडूंत ९२ धावा. दोन्ही संघ या मैदानावर अपराजित राहिले आहेत. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला पराभूत केले आहे, तर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. तसेच न्यूझीलंडने आयसीसी विश्वचषक स्पर्धांच्या उपांत्य फेरीचे तीन सामने जिंकले तर आठ सामने गमावले आहेत. दुसरीकडे पाकिस्तानने १० सामने जिंकले तर तेवढेच सामने गमावले आहेत. आतापर्यंतची आकडेवारी पाहता पाकिस्तानचे पारडे जड राहिले आहेत. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात २८ टी२० सामने खेळले गेले. त्यातील १७ सामने जिंकत पाकिस्तान आघाडीवर आहे. त्यातील ६ पैकी ४ सामने त्यांनी टी२० विश्वचषकातच जिंकले आहेत.

सामना कुठे आणि किती वाजता

हा सामना बुधवारी (९ नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (एससीजी) खेळला जाणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी एक वाजून ३० मिनिटांनी सुरू होणार आहे. थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वर पाहू शकता.

न्यूझीलंड संघ

केन विल्यमसन (कर्णधार), टिम साउथी, ईश सोधी, मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, मार्टिन गुप्टिल, लचलान फर्ग्युसन, डेव्हॉन कॉनवे, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, ट्रेंट बोल्ट, फिन ऍलन.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तान संघ

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद.