भारतीय क्रिकेट संघाचे मिशन, टी२० विश्वचषक २०२२, आज खर्‍या अर्थाने सुरू झाले आहे. टीम इंडिया आपला पहिला सराव सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहे. हा सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने ऑस्ट्रेलियाला १८७ धावांचे लक्ष्य दिले आहे. ब्रिसबेनच्या गाबा येथे सुरू असलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी संघाला उत्तम सुरूवात करून दिली.

भारताकडून सलामीवीर केएल राहुल आणि सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी केली. राहुलने ३३ चेंडूत ५७ धावांची तर सूर्यकुमारने ३३ चेंडूत ५० धावांची खेळी केली. पहिला पॉवरप्ले भारताच्या नावे राहिला, त्यांनी पहिल्या ६ षटकातच ७० धावा केल्या. यादरम्यान राहुलने २७ चेंडूत अर्धशतक केले. १० षटके पूर्ण होताच टीम इंडियाने १ गड्याच्या मोबदल्यात ८९ धावा केल्या. यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा लवकरच बाद झाला. त्याने १४ चेंडूत एक षटकार आणि एक चौकार मारत १५ धावा केल्या. त्याला ऍश्टन एगर याने ग्लेन मॅक्सवेलकरवी झेलबाद केले. राहुलने त्याच्या डावामध्ये १७२.७२च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केल्यी. त्याने ६ चौकार आणि ३ षटकार ठोकत ३३ चेंडूत ५७ धावा केल्या.

महत्त्वाच्या क्षणी भारताच्या विकेट्स पडल्याने भारताला २०० चा आकडा गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून रिचर्डसनने ३० धावात ४ बळी घेतले. रोहित-विराट लवकर बाद झाल्याने भारताचा धावफलक काहीसा संथ झाला होता, तेव्हा पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव याने स्फोटक फलंदाजी करत त्याला गती दिली.