आयसीसी एकदिवसीय महिला विश्वचषकामध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगतोय. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानसमोर २४५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. स्मृती मंधाना (५२), स्नेह राणा, पूजा वस्त्रकर यांनी अर्धशतकी खेळ खेळत भारतीय संघाला सावरले. आजचा सामना खिशात घालून विजयी सुरुवात करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे.

मिताली राजच्या नेतृत्वात भारतीय महिला संघ पाकिस्तानशी दोन हात करतोय. मागील काही दिवसांपासून भारतीय महिला संघ चांगली कामगिरी करतोय. सराव सामन्यांमध्येही या संघाने २५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. फलंदाजीमध्ये भारतीय संघ पाकिस्तानी गोलंदाजांना हात टेकायला लावेल असा विश्वास सर्वांनाच होता. मात्र सामना सुरु झाल्यानंतर समोर वेगळेच चित्र उभे राहिले. भारताने फक्त ११२ धावांपर्यंत ५ खेळाडू गमावले.

सामना सुरु झाल्यानंतर दुसऱ्याच षटकामध्ये सेफाली शर्मा तंबूत परतली. ती एकही धाव करु शकली नाही. त्यानंतर दिप्ती शर्मा आणि मंधाना यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागिदारी केली. नंतर २१ व्या षटकात पाकिस्तानी खेळाडू नर्शा संधूने दिप्ती शर्माला ४० धावांवर तंबूत पाठवले. त्यानंतर मात्र हरमनप्रीत कौर, रिचा घोष, मिताली राज या मैदानावर जास्त तग धरू शकल्या नाहीत. कौरने ५, रिचा घोषने १ तर मितालीने अवघ्या ९ धावा केल्या. पुढे स्नेह राणा आणि पूजा वस्त्राकर यांनी मैदानवर पाय घट्ट रोवले. या जोडीने शतकी भागिदारी केल्यामुळे भारतीय संघ थोडासा सावरला. पूजाने ४८ चेंडूमध्ये आपले अर्धशतक पूर्ण करुन भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणले. तर राणानेही ४६ चेंडूमध्ये अर्धशतक केले. राणाने ४८ चेंडूंमध्ये ५३ धावा केल्या तर पूजा मैदानात टीकून राहून ५९ चेंडूंमध्ये ६७ धावा केल्या. हे दोन्ही खेळाडू नाबाद राहिले.

तर दुसरीकडे पाकिस्तान महिला संघाची कामगिरी चांगली राहिली. दिना बैगने शेफाली वर्मला शून्य धावांवर तंबूत परत पाठवल्यामुळे पाकिस्तानी गोलंदाजांच्या आकांक्षा वाढल्या. त्यानंतर दिप्ती शर्मा आणि मंधाना यांची जोडी तोडण्यासाठी पाकिस्तानी गोलंदाजांना मेहनत घ्यावी लागली. पुढे २१ व्या षटकात नशरा संधूने दिप्तीला ४० धावांमध्ये बाद केले. पुढे मात्र पाकिस्तानी गोलंदाज भारतीय फलंदाजांसाठी डोकेदुखी ठऱले. नशरा संधूनेच मंधानला ५२ धावांवर तंबूत पाठवल्यामुळे भारतीय संघ खिळखिळा झाला. त्यानंतर निदा दरने हरमनप्रित कौर आणि रिचा घोष यांचा बळी घेतल्यामुळे भारताची स्थिती ११२ धावांवर पाच गडी बाद अशी झाली. नंतर कर्णधार असलेल्या मिताली राजला नशरा संधूनेच अवघ्या ९ धावांवर झेलबाद केले.

आपल्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघ २५० धावांचे लक्ष्य गाठेल अशी अपेक्षा होती. मात्र पाकिस्तानी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे भारतीय संघाला सात गडी बाद २४४ धावा करता आल्या. पाकिस्तान २४५ धावांचे आव्हान गाठणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.