विराट कोहलीने मैदानावर आपण कुशल संघनायक असल्याचे सिद्ध केले आहेच; पण त्याचबरोबर स्वत:च्या आणि खेळाडूंच्या मानधन आणि वेळ या ज्या प्रमुख समस्या आहेत त्यांच्यासाठी निधडय़ा छातीने लढण्याचे धारिष्टय़ही दाखवले आहे. काही महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेटच्या गडगंज गरिबीसंदर्भात त्याने गाऱ्हाणे मांडले होते. त्याच्याच रणनीतीमुळे नियुक्त झालेले प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीसुद्धा त्या वेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) देशातील क्रिकेटपटूंना सन्मान म्हणून वेतन नव्हे, तर शेंगा देते, असे भाष्य केले होते. पैशासाठी लढा दिल्यानंतर आता भारतीय क्रिकेटपटूंना व्यग्र वेळापत्रकामुळे वर्षभर क्रिकेट सामने खेळावे लागतात, अशी वेदना कोहलीने प्रकट केली. आगामी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी पुरेसा वेळ दिलेला नाही, ही वास्तववादी समस्या समोर मांडून, त्याने अचूक निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेने जागतिक क्रिकेट वेळापत्रकावर २००८ पासून आपले अधिराज्य गाजवायला सुरुवात केल्यापासून क्रिकेटपटू व्यग्र झाला. दीड महिना आयपीएल खेळायचे आणि त्याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटही. २०१७ या चालू वर्षांचा आढावा घेतल्यास भारतीय क्रिकेट संघ आतापर्यंत १० कसोटी, २६ एकदिवसीय आणि १० ट्वेन्टी-२० सामने खेळला. याचा अर्थ ८६ दिवस हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे. याशिवाय ४७ दिवसांच्या आयपीएलमधील १४ ते १७ सामने हे प्रत्येक संघाला खेळायला मिळतात. अजून हंगाम संपायचा असून, श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामने शिल्लक आहेत. म्हणजे जास्तीत जास्त ११९ दिवसांचे नियोजन भारतीय क्रिकेटपटूसाठी वेळापत्रकाच्या स्वरूपात असते. यापैकी सर्वात जास्त सामने खेळणे या निकषांतर्गत व्यग्र क्रिकेटपटूंमध्ये कोहली, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंडय़ा, भुवनेश्वर कुमार अशी नावे येतात. या क्रिकेटपटूंचे वर्गीकरण केल्यास धोनी, केदार जाधव, पंडय़ा, जसप्रीत बुमराह हे खेळाडू मर्यादित षटकांचे सामने अधिक खेळतात, तर चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना कसोटीसाठी प्राधान्य दिले जाते. त्यामुळे विश्रांतीचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो.

या सर्व क्रिकेटपटूंपैकी कोहली हा एकमेव क्रिकेटपटू आहे की, जो भारताच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये फक्त एकच सामना खेळू शकला नाही. त्यामुळे व्यग्रपणा ही त्याची वैयक्तिक अडचण ठरू शकते, सांघिक नव्हे. विराट हा ‘फोर्ब्स’च्या यादीत अव्वल १०० खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारा एकमेव क्रिकेटपटू आहे, या सत्याकडेसुद्धा डोळेझाक करता येणार नाही. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा भाग असूनही विराट उत्तम कमाई करतो. सर्वाधिक सामने खेळलेल्या भारतीय खेळाडूंच्या यादीत ३६ सामने खेळलेला धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु कसोटी सामने न खेळल्यामुळे त्याला हा काळ विश्रांतीसाठी मिळाला, याकडेसुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही.

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या क्रीडापटूंसाठी घोषणा केली होती. खेळाडूंनी फक्त खेळावे आणि पदक जिंकावे. या खेळाडूंना उत्तम शासकीय नोकरी देण्यात येईल आणि पगारसुद्धा घरपोच मिळेल. या घोषणेत मर्म इतकेच की खेळाडूंनी फक्त खेळावे, त्यांना पैसा मिळेल. भारताचा अ-श्रेणीतील क्रिकेटपटू वर्षांला दोन कोटी, ब-श्रेणीतील एक कोटी आणि क-श्रेणीतील ५० लाख रुपये वेतन मिळवतो. याशिवाय स्थानिक क्रिकेट, आयपीएल आणि अन्य जाहिराती वगैरेचे मानधन या सर्व गोष्टींची बेरीज केल्यास कोणताही क्रिकेटपटू सहज कोटी कोटी उड्डाणे घेतो.

काही दशकांपूर्वी अशी परिस्थिती मुळीच नव्हती. भारतीय क्रिकेटपटूंना आपल्या नोकऱ्यासुद्धा सांभाळाव्या लागायच्या. भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर त्या दिवसांविषयी सांगतात, ‘‘आमच्या काळात क्रिकेटमध्ये पैसा नव्हता. रणजी करंडकाच्या एका सामन्याचे मानधन हे शंभर रुपये होते. त्यामुळे नोकरीद्वारे मिळणारा पगार हेच सर्वस्व होते. अगदी टाइम्स शील्डमध्ये कामगिरी चांगली झाली तरी पगारवाढ किंवा पदोन्नती मिळायची!’’ याबाबत विश्वविजेता कर्णधार कपिलदेवचा सल्लासुद्धा मोलाचा आहे. तो म्हणतो, ‘‘जर कोणत्याही क्रिकेटपटूला खेळायचे नसेल, तर त्याने विश्रांती घ्यावी. व्यावसायिक क्रिकेटपटूचा दृष्टिकोन हा असाच हवा. व्यावसायिक संस्कृतीत जर एखाद्याला एखादी गोष्ट करायची नसेल, तर त्याने ती करू नये, अन्य कुणी ती करील.’’ क्रिकेटपटूच्या कारकीर्दीचे गांभीर्य खरे लक्षात आले आहे ते रोहित शर्माच्या. क्रिकेटपटूची कारकीर्द मर्यादित असते. ६०-७० वर्षांपर्यंत क्रिकेटपटू खेळत नाही. त्यामुळे उपलब्ध कालावधीत कारकीर्द उंचावणे, हेच खेळाडूने करायला हवे. त्यामुळे व्यग्र वेळापत्रक, विश्रांती अशी तक्रार करणे योग्य नाही, असे त्याने म्हटले होते.

क्रिकेटपटूची कारकीर्द ही सरासरी १५ ते १८ वर्षांची असते. या कालखंडात त्याचे बहरणे हे तंदुरुस्ती, फॉर्म आणि प्रेरणा यांच्यावर अवलंबून असते. परंतु क्रिकेटचा विचार केल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे जवळपास ७० टक्के अर्थकारण हे भारताशी निगडित आहे. त्यामुळे भारताच्या क्रिकेट सामन्यांचे प्रमाणही अधिक असणे स्वाभाविक आहे. या परिस्थितीत कोहलीने व्यग्र वेळापत्रकाविषयी खंत प्रकट करणे कितपत योग्य आहे. दक्षिण आफ्रिका किंवा तशा महत्त्वाच्या दौऱ्यांसाठी पुरेसा सराव आवश्यक आहे, हा कोहलीचा मुद्दा योग्यच आहे.

पण या व्यग्र वेळापत्रकामुळेच तो विक्रमांचे अनेक इमले बांधू शकला आहे आणि त्यामुळेच त्याची ‘ब्रँड व्हॅल्यू’ वाढली आहे. वार्षिक वेळापत्रक आखताना त्याचा गंभीर विचार व्हायला हवा, तरच भारताची परदेशातील कामगिरीसुद्धा उंचावेल.

प्रशांत केणी

prashant.keni@expressindia.com

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Importance of virat kohli in indian cricket team
First published on: 26-11-2017 at 01:59 IST