Abhishek Sharma Got Out On Golden Duck: आशिया चषक २०२५ स्पर्धेत भारताचा युवा फलंदाज अभिषेक शर्माच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. टी-२० क्रिकेटमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाडल्यानंतर तो भारतीय अ संघाकडून ऑस्ट्रेलिया अ विरूद्ध दुसरा वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. कानपूरमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात तो गोल्डन डकवर बाद होऊन माघारी परतला आहे. भारतीय अ संघाला या सामन्यात हवी तशी सुरूवात करता आलेली नाही.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजयाची नोंद केली होती. दुसऱ्या सामन्यात भारतीय अ संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी आला. पण स्टार खेळाडू असतानाही भारतीय अ संघाला हवी तशी सुरूवात करता आलेली नाही. अवघ्या २१ धावांवर भारतीय संघातील टॉप ३ फलंदाज माघारी परतले होते. अभिषेक शर्मा या सामन्यात डावाची सुरूवात करण्याची मैदानात आला. त्याच्याकडून दमदार सुरूवातीची अपेक्षा होती. पण तो पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतला. त्याला ऑस्ट्रेलिया अ संघाचा कर्णधार जॅक एडवर्ड्सने यष्टीरक्षकाच्या हातून झेलबाद करत माघारी धाडलं.
आशिया चषक २०२५ स्पर्धेत दमदार कामगिरी
अभिषेक शर्माला पहिल्यांदाच आशिया चषक स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली. या संधीचा त्याने चांगलाच फायदा घेतला. या स्पर्धेतील ७ सामन्यांमध्ये त्याने ४४.८५ च्या सरासरीने फलंदाजी करताा ३१४ धावा केल्या. ही या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या देखील आहे. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात तो स्वस्तात माघारी परतला. पण त्याआधी झालेल्या सामन्यांमध्ये त्याने लागोपाठ ३ अर्धशतकं झळकावली. या कामगिरीच्या बळावर त्याची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली.
अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतला. तर दुसरीकडे कर्णधार श्रेयस अय्यर १३ चेंडूंचा सामना करून अवघ्या ८ धावा करत माघारी परतला. तर प्रभसिमरन सिंगला केवळ १ धाव करता आली. श्रेयस अय्यरने गेल्या सामन्यात ८३ चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने ११० धावांची खेळी केली होती. त्याची ही खेळी पाहता तो दुसऱ्या सामन्यातही मोठी खेळी करेल असं वाटलं होतं. गेल्या सामन्यात प्रभसिमरन सिंगने ५६ धावांची खेळी केली होती. तर या खेळीच्या बळावर भारतीय अ संघाने ६ गडी बाद ४१३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया अ संघाचा डाव २४२ धावांवर आटोपला होता. या सामन्यात भारतीय अ संघाने १७१ धावांनी दमदार विजयाची नोंद केली होती.