India A vs Australia A: ऑस्ट्रेलियाचा महिला संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संधांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. येत्या काही दिवसात भारतात आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही मालिका अतिशय महत्वाची आहे. कारण भारतीय संघाला या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून कडवी झुंज मिळू शकते. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार विजयाची नोंद केली. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने पुनरागमन केलं आणि मालिका १-१ ने बरोबरीत आणली. दरम्यान मालिकेतील तिसरा सामना निर्णायक असणार आहे.

भारतीय संघाने मालिका बरोबरीत आणून मालिका जिंकण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकलं आहे. त्यामुळे मालिकेतील शेवटचा सामना जिंकून भारतीय संघाकडे इतिहासाला गवसणी घालण्याची संधी असणार आहे. याआधी भारतीय संघ द्विपक्षीय मालिकेत ऑस्ट्रेलियाला आजवर हरवू शकलेला नाही. त्यामुळे ही मालिका जिंकली तर भारतीय संघासाठी ऐतिहासिक क्षण असेल. यासह वर्ल्डकपआधी भारतीय संघाचा आत्मविश्वास देखील उंचावेल.

द्विपक्षीय मालिकेत ऑस्ट्रेलियाला हरवणं मुळीच सोपं नाही. भारतीय संघाला जर इतिहासाला गवसणी घालायची असेल फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात ऑस्ट्रेलियाला मागे सोडावं लागणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने १०२ धावांनी विजय मिळवला आणि दमदार पुनरागमन केलं. हा ऑस्ट्रेलियाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा (धावांच्या बाबतीत) ठरला.

भारतीय संघाला मालिकेतील पहिला सामना जिंकण्याची संधी होती. पण क्षेत्ररक्षणात केलेल्या चुका भारतीय संघाला भारी पडल्या. भारतीय संघाने मालिकेतील पहिल्या सामन्यात ६ आणि दुसऱ्या सामन्यात ४ असे दोन्ही सामन्यात मिळून १० झेल सोडले. ज्यात काही झेल असे होते जे खूप सोपे होते. जर भारतीय संघाने या चुका सुधारल्या, तर नक्कीच भारतीय संघ तिसऱ्या मालिकेत विजय मिळवू शकतो.

या मालिकेसाठी असा आहे भारतीय महिला संघ:

भारतीय संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), उमा छेत्री, हरलीन देओल, ऋचा घोष (यष्टीरक्षक), क्रांती गौड, स्म्रिती मंधाना, प्रतिका रावल, स्नेह राणा, अरुंधति रेड्डी, रेणुका सिंग, दीप्ति शर्मा, श्री चरणी, राधा यादव, तेजल हसब्निस, सयाली सतघरे.