१९४७ सालापासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या भूमीमध्ये ज्या कामगिरीची वाट पाहत होता, अखेर तो दिवस आज उजाडला आहे. विराट कोहलीच्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा भीमपराक्रम केला आहे. ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ च्या फरकाने विजयी झाला आहे. सिडनी कसोटीच्या अखेरच्या दिवसात भारताला विजयाची चांगली संधी होती. मात्र अंधुक प्रकाश आणि पावसाने भारताच्या इराद्यावर पाणी फिरवलं. अखेर दोन्ही पंचांनी खेळपट्टीची पाहणी करुन दोन्ही कर्णधारांच्या संमतीने सामना अनिर्णीत घोषित केला. चेतेश्वर पुजाराला सामनावीर आणि मालिकावीराच्या किताबाने गौरवण्यात आलं.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर आटोपल्यामुळे त्यांच्यावर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली. पहिल्या डावात सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि मार्कस हॅरिस या जोडीने सावध सुरुवात करत संघाला ५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. पण त्यानंतर उस्मान ख्वाजा (२७) बाद झाला. दुसऱ्या सत्रात खेळपट्टीवर स्थिरावलेला हॅरिसदेखील बाद झाला. त्याने ७९ धावा केल्या. पाठोपाठ शॉन मार्श ८ धावांवर बाद झाला. चांगली सुरूवात मिळालेला लॅबसचेंज ३८ धावा करून माघारी परतला. नंतर ट्रेव्हिस हेड २० धावा करून बाद झाला. तर तिसऱ्या सत्रात पहिल्याच षटकात कर्णधार टीम पेन (५) तंबूत परतला. चौथ्या दिवशी खेळ सुरू झाल्यावर यजमानांनी ३ गडी झटपट गमावले. कमिन्स (२५), हँड्सकॉम्ब (३७) आणि लॉयन (०) हे पाठोपाठ बाद झाले. शेवटच्या जोडीने चांगली झुंज दिली पण कुलदीपने ती जोडी फोडत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० वर संपवला. कुलदीपने सर्वाधिक ५, जाडेजा आणि शमीने प्रत्येकी २ तर बुमराहने १ बळी टिपला. पहिल्या डावात भारताने ३२२ धावांची आघाडी घेतली.

त्याआधी भारताने पहिला डाव ७ बाद ६२२ वर घोषित केला. पहिल्या दिवशी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी घेतली होती. पण भारतीय संघाची सुरुवात अडखळती झाली. संघात पुन्हा संधी मिळालेल्या लोकेश राहुलला अवघ्या ९ धावाच करता आल्या. जॉश हेजलवूडने त्याला माघारी पाठवले. नवोदित मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी डाव सावरला. त्यामुळे उपहारापर्यंत भारताने एका गड्याच्या मोबदल्यात ६९ धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या सत्रात मयंक ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७७ धावा करून झेलबाद झाला. दुसऱ्या विकेटसाठी त्याने पुजारासोबत ११६ धावांची भागीदारी रचली. चेतेश्वर पुजाराने कर्णधार विराट कोहलीला हाताशी घेत डाव पुढे नेला. पुजाराने अर्धशतक पूर्ण करत चहापानापर्यंत भारताला २ गड्यांच्या मोबदल्यात १७७ धावांपर्यंत मजल मारून दिली. शेवटच्या सत्रात आधी कर्णधार कोहली २३ धावांवर आणि काही कालावधीने उपकर्णधार अजिंक्य रहाणे १८ धावांवर तंबूत परतला. त्यामुळे पहिल्या दिवसअखेर भारताने ४ बाद ३०३ अशी भक्कम धावसंख्या उभारली होती. दुसऱ्या सत्रात पहिल्या सत्रात नॅथन लॉयनने विहारीचा बळी टिपला. त्याने ४२ धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने आपला फॉर्म कायम राखत दीडशतक लगावले, पण द्विशतकाने त्याला हुलकावणी दिली. तो १९३ धावांवर बाद झाला. ऋषभ पंतने नाबाद १५९ धावा केल्या. अखेर जाडेजा ८२ धावांवर बाद झाल्यानंतर भारताचा डाव घोषित करण्यात आला.

Live Blog

07:20 (IST)07 Jan 2019
पावसाची संततधार सुरूच

भारताच्या विजयामध्ये पाऊस अडसर ठरत आहे. पावसाची संततधार सुरूच असल्याने अद्यापही पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झालेली नाही.

--

05:39 (IST)07 Jan 2019
पावसामुळे सामना सुरू होण्यास उशीर

कसोटी मालिकेतील आजचा शेवटच्या दिवसाचा खेळ आहे. मात्र पावसामुळे अद्याप शेवटच्या दिवसाचा खेळ सुरू झालेला नाही.