भारतीय संघाने रविवारी (दि. १९ फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ६ विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. हा विजय मिळवताच भारतीय संघ ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-०ने आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयात केएस भरत, चेतेश्वर पुजारा यांच्यासोबत आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनीही सिंहाचा वाटा उचलला आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघाने मागील ३६ वर्षांचा दिल्ली कसोटी जिंकण्याचा विक्रमही कायम ठेवला.

चेतेश्वर पुजाराचा हा १००वा कसोटी सामना होता मात्र त्याला यात शतक करता आले नाही म्हणून तो नाराज होता. सामना संपल्यानंतर स्टार स्पोर्ट्सने त्याची सविस्तर मुलाखत घेतली, यावेळी मोहम्मद कैफ, गौतम गंभीर आणि सूत्रसंचालक जतीन सप्रू होते. विजयी धाव काढण्याचे सौभाग्य तुला मिळाले असा प्रश्न कैफने विचारल्यावर पुजाराने भन्नाट उत्तर दिले. “भारताच्या पहिल्या डावात मी लवकर बाद झालो त्यामुळे खूप नाराज होतो मला फार वाईट वाटले. कारण माझ्यावर १००व्या कसोटीचा दबाव होता. त्यानंतर मी थोडासा शांत होऊन विचार केला, नेटमध्ये जाऊन सराव करत दबाब कमी करण्याचा प्रयत्न केला. मला माहिती होते कारण दुसरा डावात फलंदाजी करणे एवढे सोपे नसणार. मग मी अधिक लक्षपूर्वक फलंदाजी केली रोहित ज्यावेळी धावबाद झाला त्यावेळी मला फार वाईट वाटले. स्वतःला सावरत टीम इंडियाला माझ्या बॅटने विजयी चौकार मारण्याची संधी मिळाली हेच माझ्यासाठी खूप आहे.”

हेही वाचा:IND vs AUS 2nd Test: रोहितचा त्याग! पुजाराच्या १००व्या कसोटीसाठी स्वतः झाला रनआऊट, Video व्हायरल

पुढे बोलताना तो म्हणाला की, “ हा क्षण माझ्यासाठी खूप अभिमानाचा आहे कारण नेहमी संघाला माझ्याकडून काय हवे आहे याचा विचार मी केला. १००वा कसोटी सामना माझ्या कुटंबासाठी भावनिक होता. मला लहानपणापासूनचे स्वप्न होते की टीम इंडियाकडून खेळेन पण असं कधीच वाटलं नाही की १०० कसोटी सामने खेळेन.” त्यावर स्टेडियममधील चाहत्यांनी एकाच जल्लोष केला.

जतीन सप्रूने पुढे प्रश्न विचारला, “ तुम्हाला असे कधी वाटले होते का, एवढ्या लवकर भारत सामना जिंकेल आणि ऑस्ट्रेलिया ऑलआऊट होईल?” यावर पुजाराने उत्तर दिले की, “ काल ज्या पद्धतीने ऑसी खेळत होते १० षटकात त्यांनी ६१ धावा केल्या होत्या त्यावरून आम्हाला थोडी चिंता वाटत होती. कारण जर त्यांनी २०० ते २५० धावा केल्या असत्या तर आम्ही थोडे अडचणीत आलो असतो. पण अश्विन-जडेजाने सकाळी जी अफलातून गोलंदाजी केली ती वाखाणण्याजोगी आहे.”

हेही वाचा: IND vs AUS 2nd Test: अडीच दिवसात कांगारूंचा खेळ खल्लास! भारताचा ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय; मालिकेत २-०ने विजयी आघाडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुजाराचे कौतुक करताना मोहम्मद कैफ म्हणाला, “चेतेश्वर म्हणजे ईश्वर! कारण हा माणूस फक्त कसोटी क्रिकेट खेळतो आणि कसोटी क्रिकेट काही सतत होत नाही मध्ये दोन-तीन कधी कधी चार-पाच महिन्यांचा काळ निघून जातो. त्यादरम्यान रणजी खेळायला जाणे, स्वतःला तंदुरस्त ठेवणे हे सोपे काम नाही. लागोपाठ एवढे वर्ष फक्त एकच प्रकारात खेळणे हे नवीन क्रिकेटपटूंनी यामधून काहीतरी शिकण्यासारखे आहे.”