भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसरा कसोटी सामना इंदोर येथे बुधवारपासून (दि. १ मार्च) खेळला जात आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाची दाणादाण उडवली आहे. पहिल्या दोन कसोटीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला होता, तो तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने कमी करून टाकला. भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या १०९ धावांवर सर्वबाद झाला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामनाही तीन दिवसांत संपेल असे दिसते आहे कारण इंदोर कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली होती आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ सध्या सामन्यात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या दिवसाच्या चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने १ गडी गमावून ७१ धावा केल्या आहेत आणि आता भारताच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा फक्त ३८ धावा मागे आहेत.

मात्र, ऑस्ट्रेलियाला इथपर्यंत पोहोचवण्यात रवींद्र जडेजानेही मोलाचे योगदान दिले. पहिल्या डावात जडेजा बॅटने फ्लॉप झाला होता पण चेंडूने त्याने ट्रॅव्हिस हेडच्या रूपाने भारताला पहिली विकेट मिळवून दिली. ट्रॅव्हिस हेडनंतर मार्नस लाबुशेनही त्रिफळाचीत झाला पण जडेजाच्या नो बॉलने संपूर्ण खेळ खराब केला आणि तिथेच सामना फिरला. त्यानंतर जडेजाने उस्मान ख्वाजाविरुद्ध दोन डीआरएस रिव्ह्यू घेतले आणि ते वाया गेले. मग रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर तो पायचीत झाला असता मात्र रोहित शर्माने डीआरएस घेतला नाही आणि रिप्ले मध्ये तो बाद असल्याचे स्पष्ट दिसत होते.

जडेजाच्या चेंडूवर लाबुशेन बाद झाला त्यावेळी त्याचे खातेही उघडले नव्हते, त्यामुळे भारताला ती विकेट मिळाली असती तर कांगारू संघ अडचणीत आला असता, मात्र त्यानंतर लाबुशेनने भारताला पुनरागमनाची संधी दिली नाही. चहापानापर्यंत ख्वाजासोबत त्याने ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत आणले. सध्या लाबुशेन ५१ चेंडूत १६ धावा करत असून मोठी खेळी खेळण्यात तो यशस्वी ठरला तर जडेजाला आपल्या नो बॉलचा पश्चाताप होईल.

हेही वाचा: IND vs AUS 3rd Test: उमेश यादवचा गुडघे टेकून गगनचुंबी षटकार अन् विराटची मजेशीर रिअ‍ॅक्शन, Video व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जडेजाचा नो बॉल पाहून मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडलाही धक्का बसला आणि त्याने डोके हलवून आपली नाराजी व्यक्त केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि चाहते जडेजाला नो बॉल टाकल्याबद्दल फटकारताना दिसले. सध्या हा कसोटी सामना अशा टप्प्यावर आहे की, शेवटच्या सत्रात जर भारताला गठ्ठ्यात विकेट्स मिळाल्या नाहीत, तर भारत या सामन्यात खूप मागे असेल.