भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिला आणि शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाला. तर मालिकेतील २ सामने जिंकून भारतीय संघाने ही मालिका २-१ ने खिशात घातली. या विजयासह भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात जाऊन टी-२० मालिका जिंकण्याची मालिका सुरू ठेवली. या मालिकेत भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करणाऱ्या अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी मिळून धावांचा पाऊस पाडला. हे दोन्ही फलंदाज या मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले. दरम्यान या जोडीच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
अभिषेक – शुबमनच्या जोडीचा विक्रम
भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करताना अभिषेक शर्माने दमदार सुरूवात करून दिली. त्याची प्लेअर ऑफ द मॅच म्हणून निवड करण्यात आली. तर दुसरीकडे शुबमन गिलला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. पण त्याने सुरूवातीला आक्रमक खेळी करून मोलाचं योगदान दिलं होतं. या जोडीने ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ही जोडी ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना एकाच टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारी जोडी ठरली आहे.
मालिकेतील दोन सामने पावसामुळे रद्द झाले. पण या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला चांगली सुरूवात मिळाली होती. मालिकेतील पाचवा सामना रद्द होण्यापूर्वी अभिषेक आणि गिलने मिळून पहिल्या विकेटसाठी ५२ धावा जोडल्या होत्या. या जोडीने या टी-२० मालिकेत १८८ धावांची भागीदारी केली. या जोडीने मिळून दक्षिण आफ्रिकेच्या जोडीचा विक्रम मोडून काढला आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हिस आणि ट्रिस्टन स्टब्स या जोडीने ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना याच वर्षी १८७ धावांची भागीदारी केली होती. तर रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना १८३ धावांची भागीदारी केली होती.
ऑस्ट्रेलियात टी-२० मालिका खेळताना सर्वाधिक धावा जोडणाऱ्या जोड्या
अभिषेक शर्मा- शुबमन गिल- १८८ धावा, २०२५
डेवाल्ड ब्रेव्हिस- ट्रिस्टन स्टब्स – १८७ धावा, २०२५
रोहित शर्मा- शिखर धवन- १८३ धावा, २०१६
