India vs Australia, U19 World Cup Final Updates : एकोणीस वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर निर्धारित ५० षटकांमध्ये ७ बाद २५३ धावांचा डोंगर उभा केला आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाने फायनलमध्ये २५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. दक्षिण आफ्रिकेतील सहारा पार्क मैदानातील खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल असल्यामुळे या मैदानावर २५३ ही खूप मोठी धावसंख्या मानली जात आहे. त्यामुळे भारतासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. विश्वचषक उंचावण्यासाठी कर्णधार उदय सहारनच्या संघाला निर्धारित ५० षटकांमध्ये २५४ धावांची आवश्यकता आहे.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ह्यू वैबगेनच्या बाजूने लागला. त्यानंतर वैबगेनने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिला डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून या सामन्यात हरजस सिंह याने सर्वाधिक ५५ धावांची खेळी साकारली. ६५ चेंडूत त्याने ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावलं. त्याचबरोबर स्वतः कर्णधार ह्यू वैबगेन (४८), ऑली पीक नाबाद ४६ आणि सलामीवीर हॅरी डिक्सन याने ४२ धावांची खेळी साकारत ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. गोलंदाजीत भारताकडून राज लिंबानी याने सर्वाधिक ३ बळी घेतले, तर नमन तिवारीने दोन कांगारूंना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. सौमी कुमार पांडे आणि मुशीर खान या दोघांनी प्रत्येकी एक बळी टीपला.

राज लिम्बानी याने सामन्यातील तिसऱ्या षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर सॅम कोन्स्टॅसचा भोपळ्यावर त्रिफळा उडवला. त्यानंतर सलामीवीर हॅरी डिक्सन आणि कर्णधार ह्यु वैबगन या दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. नमन तिवारीच्या पहिल्याच षटकात दोघांनी १५ धावा चोपल्या. त्यानंतर कर्णधार उदय सहारन याने बराच वेळ चेंडू नमनकडे सोपवला नाही. अखेर २१ व्या कर्णधाराने पुन्हा एकदा नमनला पाचारण केलं. नमनने डिक्सन आणि ह्यू या दोघांची जोडी फोडली. नमनने वैबगेन आणि डिक्सन या दोघांनाही पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर हरजस सिंह आणि ऑली पीक या दोघांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आणि धावसंख्या २५० पार नेली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या

एकोणीस वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाने अंतिम सामन्यात २५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी १९९८ च्या एकोणीस वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडविरोधात खेळताना २४२ धावा केल्या होत्या. त्याच सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २४१ धावा जमवल्या होत्या.