Usman Khwaja Century:  गुरुवारपासून (दि. ९ मार्च) सुरू झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी मैदानावर हजेरी लावली होती. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील मैत्रीला ऐतिहासिक ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावर ऑस्ट्रेलियन कर्णधार अँथनी अल्बानीज भारतात आले होते. यावेळी त्यांनी होळी सणाचा आनंद लुटला आणि त्यानंतर अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदारही बनले. त्यात आणखी ऑस्ट्रेलियासाठी आनंदाची बातमी म्हणजे सलामीवीर उस्मान ख्वाजाने दमदार शतक झळकावत पहिल्या दिवसअखेर कांगारूंना सुस्थितीत नेले. त्याचे भारताविरुद्ध हे पहिले शतक आहे.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सहाव्या षटकात उमेश यादवच्या गोलंदाजीवर ट्रॅविस हेडचा ७ धावांवर सोपा झेल यष्टिरक्षक केएस भरतने सोडला. ट्रॅविस हेड व ख्वाजा यांनी चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु आर अश्विनने हेडला (३२) माघारी पाठवले. मोहम्मद शमीने मार्नस लाबुशेनचा (३) क्लीनबोल्ड करत तंबूत पाठवले. उस्मान ख्वाजा चांगल्या फॉर्मात दिसला आणि त्याला कर्णधार स्टीव्ह स्मिथची साथ मिळाली. अहमदाबादची खेळपट्टी गोलंदाजांना फार मदत करताना दिसत नव्हती, त्यामुळे भारतीय गोलंदाजांना लाईन लेन्थवरच लक्ष ठेवून फलंदाजाकडून चूक व्हायची वाट पाहत होते.

उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली असून दोन्ही फलंदाज चांगल्या लयीत खेळत आहेत आणि वेगाने धावा करत आहेत. ख्वाजाने शतक झळकावत संघाला मजबूत स्थितीत नेले आहे. त्याच वेळी, ग्रीन देखील चांगल्या लयमध्ये दिसत असून आक्रमक फटके मारत आहे. सध्या तो २५१ चेंडूत १०४ धावा करून तो खेळपट्टीवर टिकून आहे. तर कॅमेरून ग्रीन अर्धशतकापासून केवळ एक धावा दूर आहे. दिवसअखेर २५५ धावा झाल्या असून ४ गडी बाद अशा सुस्थितीत आहे. भारताकडून शमीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या आणि जडेजा-अश्विनने १-१ विकेट घेतली.

तत्पूर्वी, स्टीव्ह स्मिथ व उस्मान ख्वाजा यांनीही संयमी खेळ सुरू ठेवला. ख्वाजा व स्मिथ यांची २४८ चेंडूंतील ७९ धावांची भागिदारी रवींद्र जडेजाने तोडली. जडेजाच्या चेंडूवर हलक्या हाताने फटका मारण्याचा प्रयत्न फसला. स्मिथच्या बॅट अन् पॅडला चेंडू घासून स्टंपवर आदळला. स्मिथने रागाच्या भरात बॅट मैदानावर आपटली. तो १३५ चेंडूंत ३८ धावांवर माघारी परतला. त्यानंतर मोहम्मद शमीने डावातील दुसरी विकेट घेताना पीटर हँड्सकोम्बाला (१७) क्लीनबोल्ड केले. ऑस्ट्रेलियाने १७० धावांवर चौथी विकेट गमावली.

हेही वाचा: IND vs AUS: अ‍ॅक्शन रिप्ले! चतुर मोहम्मद शमीची भेदक गोलंदाजी अन् लाबुशेन-हँड्स्कॉंबच्या दांड्यागुल, पाहा Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला कसोटी मालिका आपल्या नावावर करायची आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवायचे आहे. त्यासाठी भारतीय गोलंदाज किती लवकर कांगारूंना तंबूत पाठवतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.