Virat Kohli Retirement: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना अॅडलेड ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला हवी तशी सुरूवात करता आलेली नाही. शुबमन गिल अवघ्या ९ धावा करून माघारी परतल्यानंतर, विराट कोहली मैदानावर आला. पण तिसऱ्याच चेंडूवर तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला. दरम्यान मैदानाबाहेर जात असताना, त्याने हात वर करून जो इशारा केला, त्यावरून तो लवकरत निवृत्तीची घोषणा करू शकतो अशी चर्चा रंगली आहे.
विराट कोहली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेनंतर पहिल्यांदाच वनडे मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. ७ महिन्यांनंतर पुनरागमन करताना त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. मालिकेतील पहिला वनडे सामना पर्थच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात विराटने ८ चेंडू खेळून काढले. पण त्याला खातं उघडता आलं नव्हतं. त्यानंतर दुसरा वनडे सामना अॅडलेडमध्ये सुरू आहे. या सामन्यात विराटकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. या डावातही ३ खेळून त्याला खातं उघडता आलेलं नाही. गेल्या सामन्यात झेलबाद झाल्यानंतर, या सामन्यात तो पायचित होऊन माघारी परतला. विराट कोहली सहसा शून्यावर बाद होत नाही. वनडे क्रिकेटमध्ये एकेरी दुहेरी धाव कशी घ्यायची हे विराटला चांगलं माहीत आहे. पण विराट आता १-१ धाव घेण्यासाठी संघर्ष करतोय.
विराट निवृत्ती घेणार?
अॅडलेड हे विराट कोहलीच्या सर्वात आवडत्या स्टेडियमपैकी एक आहे. या मैदानावर त्याचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. हा विराटचा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा असल्याचं देखील म्हटलं जात आहे. त्यामुळे आवडत्या मैदानावर शून्यावर बाद झाल्यानंतर मैदानाबाहेर जाताना विराट नाराज असल्याचं दिसून आलं.
पण सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी टाळ्या वाजवून त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विराटने हात वर करून जो इशारा केला, त्यावरून तो वनडे क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर करणार का? अशी चर्चा रंगली आहे. पण दुसरा अंदाज असा आहे की, हा त्याच्या आवडत्या मैदानावरील शेवटचा सामना होता. त्यामुळे त्याने तो इशारा करून अभिवादन केलं.