भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. कर्णधार रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळू शकतो. बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रोहितच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर रोहित शेवटचा वनडेही खेळू शकला नाही.
रोहित पहिल्या कसोटीलाही मुकला आणि त्याला मुंबईला परतावे लागले. त्यानंतर तो आपल्या दुखापतीसाठी एका तज्ज्ञाला भेटला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहितने स्वतः टीम मॅनेजमेंटला कळवले आहे की तो दुसऱ्या कसोटी सामन्याच्या निवडीसाठी उपलब्ध असेल.रोहित दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी शनिवारी (१७ डिसेंबर) बांगलादेशला पोहोचू शकतो.
रोहितने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अंगठ्याला दुखापत होऊनही फलंदाजी केली होती. ज्यामध्ये त्याने २८ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या होत्या, तरीही तो टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्या सामन्यात रोहित डावाची सुरुवात करण्यासाठी आला नाही आणि ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेनंतर रोहित शर्मा एकही कसोटी सामना खेळलेला नाही.
रोहितच्या जागी अभिमन्यू ईश्वरनचा समावेश करण्यात आला होता –
पहिल्या कसोटीसाठी रोहितच्या जागी अभिमन्यू ईश्वरनचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, पहिल्या कसोटीत केएल राहुल आणि शुबमन गिलने सलामी दिली. त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. भारत आणि बांगलादेश मधील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याची सुरुवात २२ डिसेंबर पासून होईल.