भारतीय संघाने शनिवारी तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात इंग्लंडवर ४९ धावांनी मात केली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे. या सामन्यासाठी विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा संघात परतले. अशा स्थितीत सलामीला आलेल्या जोडीमध्ये बदल करावा लागला कारण इशान किशन बाद झाला आणि ऋषभ पंतला मधल्या फळीत चांगली कामगिरी करता येत नव्हती. याच कारणामुळे तो रोहित शर्मासोबत ओपनिंगला आला आणि काही चेंडूंनंतर तो चिडलेला दिसत होता.
पहिल्याच षटकातील तिसरा चेंडू ऋषभ पंत खेळायला आला तेव्हा तो एका धावेसाठी धावला. पण गोलंदाज त्याच्या धावण्याच्या मध्ये आला. मात्र, पंतने कोणताही त्रास न होता धाव पूर्ण केली,कारण थ्रो स्टंपला लागला नाही. यामुळे पंत थोडा नाराज झाला आणि त्याने कर्णधार रोहित शर्माला सांगितले की, “अरे यार, हा समोर आला होता. टक्कर मारू का?’ यावर रोहित म्हणाला, ‘हो, मार.”
पंत आणि रोहितच्या या गप्पांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहित शर्मासह ऋषभ पंत पहिल्यांदाच टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओपनिंगसाठी मैदानात उतरले होता. कारण संघ व्यवस्थापनाला सुरुवातीला उजव्या आणि डाव्या हाताची जोडी हवी होती. मात्र, दोघांची जोडी ४९ धावांपर्यंत मैदानात टिकली. रोहित शर्मा ३१ धावा करून बाद झाला तर पंतने २६ धावांची खेळी खेळली.
दरम्यान, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत भारताने निर्धारित २० षटकांमध्ये आठ गडी गमावून १७० धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १७ षटकांतच गारद झाला. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक ३५ आणि डेव्हिड विलीने नाबाद ३३ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यापुढे यजमानांच्या फलंदाजांनी माना टाकल्या. भुवनेश्वर कुमारने डावाच्या पहिल्याच चेंडूवर जेसन रॉयला बाद करून आपल्या कामगिरीची झलक दाखवली. भारताच्यावतीने त्याने सर्वाधिक तीन बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी दोन बळी घेतले. तर, हार्दिक पंड्या आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येक एक गडी बाद केला.
त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने रोहित शर्मासोबत ऋषभ पंतला सलामीसाठी पाठवले. दोघांनी जोरदार फटकेबाजी करत भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. मात्र, पाचव्या षटकाच्या चेंडूवर रिचर्ड ग्लीसनच्या गोलंदाजीवर जोस बटलरने रोहितचा झेल टिपला. तो २० चेंडूत ३१ धावा करून बाद झाला. ग्लीसनच्या आंतरराष्ट्रीय टी २० कारकिर्दीतील तो पहिला बळी ठरला. त्यानंतर विराट कोहली (१) आणि ऋषभ पंत (२६) यांनाही ग्लीसनने माघारी धाडले. भारतीय फलंदाजीदेखील ढेपाळ्याच्या स्थितीमध्ये आली होती. मात्र, रविंद्र जडेजाने पाच चौकारांच्या मदतीने २९ चेंडूंमध्ये ४६ धावांची नाबाद खेळी करून भारताचा डाव सावरला.