India vs England 3rd Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, इंग्लंडकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेले दोन्ही सलामीवी फलंदाज स्वस्तात माघारी परतले आहेत. नितीश कुमार रेड्डीने एकाच षटकात दोन्ही फलंदाजांना बाद करत माघारी धाडलं आहे.
या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकला आहे. याआधी दोन वेळेस त्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, यावेळी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय सुरूवातीलाच चुकीचा ठरला आहे. कारण इंग्लंडची सलामी जोडी स्वस्तात माघारी परतली आहे. बेन डकेट अवघ्या २३ तर जॅक क्रॉली अवघ्या १८ धावांवर माघारी परतला आहे. या जोडीला पहिल्या विकेटसाठी अवघ्या ४३ धावा जोडता आल्या.
तर झाले असे की, भारतीय संघाकडून १४ वे षटक टाकण्यासाठी नितीश कुमार रेड्डी गोलंदाजीला आला. या षटकातील तिसरा चेंडू नितीश रेड्डीने लेग स्टंपच्या बाहेर टाकला. हा चेंडू बेन डकेट सोडणार होता, पण इतक्यात चेंडू बॅटची कडा घेत यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या हातात गेला. त्याने कुठलीही चूक न करता सोपा झेल घेतला. इंग्लंडला ४३ धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर जॅक क्रॉलीही बाद होऊन माघारी परतला. नितीश रेड्डीने सरळ चेंडू टाकला. पण खेळपट्टीवर असलेल्यामुळे उतारामुळे हा चेंडू हलका बाहेर गेला. त्यामुळे जॅक क्रॉलीला चेंडूचा अंदाज आला नाही. हा चेंडूही बॅटची कडा घेत यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या हातात गेला.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुबमन गिल ( कर्णधार), ऋषभ पंत ( यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह</p>
इंग्लंडची प्लेइंग ११: जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट , हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर