IND vs ENG 4th test Day 1 Live Updates: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना आजपासून म्हणजेच २३ जुलैपासून मँचेस्टरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्याची नाणेफेक झाली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे. इंग्लंडने या मालिकेतील सलग चौथ्या सामन्याची नाणेफेक जिंकली आहे. भारतीय संघाला चौथ्या कसोटीपूर्वी संघातील खेळाडूंच्या दुखापतींचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे टीम इंडियामध्ये तीन मोठे बदल करण्यात आले आहेत.
मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने किती धावा केल्या?
मँचेस्टर कसोटीत भारतीय संघाने पहिल्या दिवशी ४ बाद २६४ धावा केल्या आहेत. तर पहिल्या दिवसाच्या खेळाची वेळ अर्ध्या तासाने वाढवल्यानंतरही खेळ खराब सूर्यप्रकाशामुळे लवकर संपवण्यात आला. ऋषभ पंत रिटायर्ड हर्ट होऊन बाहेर गेल्याने भारताने ४ विकेट्सच गमावले आहेत. सध्या मैदानावर रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरची जोडी आहे.
साई सुदर्शनचं पहिलं अर्धशतक
साई सुदर्शनने मँचेस्टर कसोटीत शानदार अर्धशतक झळकावत संघाचा डाव सावरला आहे. अर्धशतकी खेळी केल्यानंतर साई सुदर्शन चुकीचा फटका खेळत स्टोक्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. साई सुदर्शनने १५१ चेंडूत ७ चौकारांसह ६१ धावांची खेळी केली.
ऋषभ पंतला दुखापत
ख्रिस वोक्सचा चेंडू डाव्या पायाच्या करंगळीजवळ लागल्याने ऋषभ पंतच्या पायाला दुखापत झाली आहे. रक्त येऊन पाय सुजल्याने त्याला चालायला देखील त्रास होत होता. त्यामुळे ऋषभ पंत रिटायर्ड हर्ट होत मैदानाबाहेर गेला.
पंत-साईची अर्धशतकी भागीदारी
तिसऱ्या सत्रात ऋषभ पंत आणि साई सुदर्शन यांनी चांगली फलंदाजी करत संघाचा डाव सावरला आहे. दुसऱ्या सत्रात ३ विकेट्स गमावत इंग्लंडने भारतावर दबाव टाकला पण साई-पंतने चांगली फलंदाजी करत भारताच्या धावांमध्ये सातत्याने भर घातली. पंत आणि सुदर्शनच्या जोडीने अर्धशतकी भागीदारी रचली.
टीब्रेक
भारताने दुसऱ्या सत्रात ३ विकेट्स गमावल्या आहेत. शुबमन गिल, केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल बाद होत माघारी परतले. यासह टीब्रेकपर्यंत भारताने ३ बाद १४९ धावा केल्या आहेत. आता ऋषभ पंत आणि साई सुदर्शनची जोडी मैदानावर आहे.
शुबमन गिल झेलबाद
बेन स्टोक्सने शुबमन गिलला झेलबाद करत भारताला तिसरा मोठा धक्का दिला आहे. शुबमन गिल स्टोक्सचा चेंडू समजण्यात चुकला आणि त्याने चेंडू सोडून दिला, पण चेंडू पॅडवर जाऊन आदळला. मैदानावरील पंचांनी त्याला बाद दिलं, पण गिल रिव्ह्यू घेतला, पण तिसऱ्या पंचांचा निर्णयही इंग्लंडच्या बाजूने लागला.
यशस्वी जैस्वाल डॉसनचा ठरला बळी
यशस्वी जैस्वाल ८ वर्षांनी पुनरागमन केलेला फिरकी गोलंदाज लायम डॉसनचा बळी ठरला. लायम डॉसनच्या गोलंदाजीवर पहिल्याच षटकात बॅटची कड घेऊन चेंडू स्लिपमध्ये गेला पण तो वाचला. त्यानंतर डॉसन सातत्याने तशीच गोलंदाजी करत होता आणि ४१व्या षटकातील पहिल्या चेंडूवर जैस्वाल चेंडू डिफेंड करायला गेला आणि स्लिपमध्ये उभ्या असलेल्या ब्रूककडून झेलबाद झाला. जैस्वाल १०७ चेंडूत ९ चौकार आणि एका अर्धशतकासह ५८ धावा करत बाद झाला.
यशस्वी जैस्वालचं अर्धशतक
यशस्वी जैस्वालने मँचेस्टर कसोटीत संयमी आणि प्रसंगी आक्रमक फटके खेळत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. जैस्वालने ९६ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकारासह ५० धावा पूर्ण केल्या. यासह भारताची धावसंख्या १०० पार पोहोचली आहे.
केएल राहुलचं अर्धशतक हुकलं
लंचब्रेकनंतर भारताने पहिली विकेट गमावली आहे. केएल राहुल ४६ धावांवर बाद झाला, चेंडू खेळायला गेला आणि स्लिपमध्ये उभ्या असलेल्या क्रॉलीने त्याला झेलबाद केलं. भारताने ९४ धावांवर पहिली विकेट गमावली आहे. मैदानावर आता जैस्वाल आणि साई सुदर्शनची जोडी आहे.
भारताने लंचब्रेकपर्यंत किती धावा केल्या?
भारताचे सलामीवीर केएल राहुल आणि यशस्वी जैस्वालने भारताला चांगली सुरूवात करून दिली आहे. पहिल्या सत्रात टीम इंडियाने एकही विकेट न गमावता ७८ धावा केल्या आहेत. इंग्लंडने चांगली गोलंदाजी केली असली तरी राहुल आणि यशस्वीनेही चांगलं प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल ४० धावा तर यशस्वी ३७ धावा करत नाबाद आहेत.
अर्धशतकी भागीदारी
राहुल आणि यशस्वी यांनी अर्धशतकी भागीदारी रचली असून चांगली सुरूवात करून दिली आहे. यासह राहुलने इंग्लंडमध्ये कसोटीत १ हजार धावांचा टप्पाही गाठला आहे. भारताने सलामीवीरांच्या भागीदारीसह २० षटकांत बिनबाद ५८ धावा केल्या आहेत.
केएल राहुल-यशस्वी जैस्वालची जोडी मैदानात
केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी भारताला चौथ्या कसोटीत चांगली सुरूवात करून दिली आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने पहिल्या दिवशी एका तासात १४ षटकांमध्ये एकही विकेट न गमावता ४२ धावा केल्या आहेत. राहुल ४७ चेंडूत २७ धावा तर जैस्वाल ३७ चेंडूत १३ धावा करत खेळत आहे.
चौथ्या कसोटी सामन्याला सुरूवात
मँचेस्टर कसोटीत भारताच्या पहिल्या डावाता सुरूवात झाली आहे. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलची जोडी मैदानात आहे. पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वाल बाद होण्यापासून वाचला, तर अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत त्याने चांगली सुरूवात केली आहे.
चौथ्या कसोटीसाठी भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये ३ मोठे बदल
भारतीय संघाने मँचेस्टर कसोटीसाठी तीन मोठे बदल केले आहेत. करूण नायरच्या जागी साई सुदर्शनला संधी देण्यात आली आहे. तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये करूण नायर आपल्या खेळीची छाप पाडू शकला नाही, त्यामुळे त्याला प्लेईंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं आहे. तर नितीश रेड्डीच्या जागी शार्दुल ठाकूर चौथा कसोटी सामना खेळणार आहे. तर आकाशदीपच्या जागी अंशुल कंबोजला प्लेईंग इलेव्हनमध्ये घेतलं आहे. अंशुल कंबोज भारताकडून कसोटीत पदार्पण केलं आहे.
भारताची प्लेईंग इलेव्हन
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज
इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), लियाम डॉसन, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर